माघार घेतलेल्या 21 पैकी 19 उमेदवारांचा अण्णा बनसोडे यांना पाठिंबा

सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार – आमदार अण्णा बनसोडे

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीची ताकद वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या 21 जणांपैकी 19 उमेदवारांनी महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे. उमेदवारांनी पाठिंबा दिल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याची ग्वाही दिली.

आकुर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे, सदाशिव खाडे, अजिज शेख, संतोष बारणे, परशुराम वाडेकर, कविता आल्हाट, अंकुश कानडे, सिकंदर सूर्यवंशी, कुणाल वाव्हळकर, चंद्रकांता सोनकांबळे, काळूराम पवार, सुधीर कांबळे, जितेंद्र ननावरे, बाबासाहेब कांबळे आणि इतर पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज माघार घेण्याची सोमवारी (दि. 4) अंतिम मुदत होती. महायुतीच्या घटक पक्षातील बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी तसेच शहरातील नेत्यांनी समजूत काढली. सर्वांनी महायुतीची ताकद वाढविण्यासाठी तसेच राज्याच्या हितासाठी महायुतीचा मुख्यमंत्री होणे गरजेचे असल्याचे सांगत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगितले. महायुतीतील नेत्यांना उमेदवारांच्या मनधरणीसाठी मोठे यश मिळाले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या 21 जणांपैकी तब्बल 19 जणांनी पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच उमेदवारांनी अण्णा बनसोडे यांचे काम सक्रियपणे करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता त्यांना विश्वासात घेऊन महायुतीमध्ये एकत्रितपणे काम करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. त्यामध्ये आम्हाला यश आले आहे. रामदास आठवले, अजित पवार यांनी चंद्रकांता सोनकांबळे यांच्याशी चर्चा केली. चंद्रकांता सोनकांबळे यांना भविष्यात चांगले पद मिळण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत.”

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, निवडणूक लढविण्याचा लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. पण पक्ष, संघटना यामध्ये काम करत असताना आपण एक कुटुंब आहोत. त्यातून कोणाला तरी एकाला जबाबदारी मिळते. महायुतीमध्ये पिंपरी विधानसभेची जबाबदारी मला मिळाली आहे. दरम्यान महायुतीमधील ज्येष्ठ नेत्यांनी नाराज उमेदवारांची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे आता सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे.”

आरपीआयचे राज्याचे संघटन सचिव परशुराम वाडेकर म्हणाले, “राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआयने 12 जागा मागितल्या होत्या. पण आम्हाला एकही जागा मिळाली नाही. आरपीआय पक्ष 15 वर्षांपासून महायुतीमध्ये आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही युती धर्माचे पालन करत विधानसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत. चंद्रकांता सोनकांबळे यांची लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपला राजीनामा पक्षाकडे दिला होता. मात्र त्यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला नाही. त्यामुळे चंद्रकांता सोनकांबळे या आरपीआय पक्षाच्या माध्यमातून यापुढील काळात सक्रियपणे काम करणार आहेत.”

चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, “आम्ही दरवेळी तिकिटाची मागणी करतो पण आम्हाला तिकीट मिळत नाही. या वेळी राज्यस्तरावर चांगले काम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पद देण्याचे आश्वासन युतीमधील नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही आमदार अण्णा बनसोडे यांचे काम करणार आहोत.”

बाबा कांबळे म्हणाले, “आमच्या मागण्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली. त्यांनी महायुतीचे सरकार आल्यानंतर आमच्या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याने उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. आम्ही या निवडणुकीत आमदार अण्णा बनसोडे यांचे काम करणार आहोत.”

“महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी माघार घेतली आहे. निवडणुकी संदर्भात जे मतभेद होते ते दूर झाले आहेत. पुढील काळात एकत्रित काम करणार असल्याचे उमेदवार जितेंद्र ननावरे यांनी सांगितले.

“व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो पक्षासाठी काम करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. आम्ही एकत्रितपणे आमदार अण्णा बनसोडे यांचे काम करणार असून त्यांना 50 हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास उमेदवार काळुराम पवार यांनी व्यक्त केला.

अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिलेले उमेदवार

चंद्रकांता सोनकांबळे, बाबासाहेब कांबळे, जितेंद्र ननावरे, काळुराम पवार, रीता सोनावणे, सुरेश लोंढे, प्रल्हाद कांबळे, चंद्रकांत लोंढे, स्वप्निल कांबळे, नवनाथ शिंदे, कृष्णा कुडुक, गौतम कूडुक, दादाराव कांबळे, मयूर जाधव, सुधीर कांबळे, मुकुंद ओव्हाळ, जाफर चौधरी, हेमंत मोरे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »