- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना
- विकास प्रकल्पांमुळे चिखलीचा कायापालट
पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या चिखली परिसराचा खऱ्या अर्थाने कायापालट 2014 नंतर सुरू झाला. या भागात आता संतपीठ, पोलीस आयुक्तालय, न्यायालय संकुल, संविधान भवन उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात चिखली परिसर शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू अर्थात ‘हार्ट ऑफ सिटी’ ठरेल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.1997 ते 2014 अशा प्रदीर्घ कालावधीत भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावे विकासापासून वंचित राहिली. मात्र 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर या भागात सर्वाधिक निधी आणला. नागरिकांच्या सहकार्याने विकासाची गंगा यापुढेही या भागात अशीच वाहत राहील, असेही आमदार लांडगे म्हणाले. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ टाळगाव चिखली येथील गणेश मंदिरात श्रीफळ अपर्ण करुन केला. यावेळी सर्व स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यावेळी म्हणाले, 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याआधी भोसरी मतदार संघातील रखडलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी “व्हिजन 20-20” नागरिकांच्या पुढे ठेवले होते. यामध्ये दिलेल्या आश्वासनानुसार कामे पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला आहे. समाविष्ट गावांसाठी स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा देण्याचे मी सांगितले होते. त्यानुसार भामा आसखेडमधून अतिरिक्त पाणी शहराला उपलब्ध झाले. रस्ते, शैक्षणिक सुविधा, मल्टीपर्पज हॉस्पिटल यांसारखे प्रकल्प दृष्टिक्षेपात आहेत. भारतातील पहिले संविधान भवन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकूल, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पासाठी चिखली जलशुद्धीकरण केंद्र याच भागात विकसित होत आहे.
रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी माझी…
आमदार महेश लांडगे म्हणाले की, चिखली परिसरातील अनेक रस्ते दृष्टिक्षेपात आहेत. ज्या भागात रस्त्यांची गरज आहे तेथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुढाकार घ्या. वाटाघाटी करून रस्त्यासाठी जागा द्या. त्या भागात रस्ता पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी आहे. विरोधक जाणीवपूर्वक जागा देण्यासाठी अडवणूक करतात आणि रस्ता झाला नाही असे खोटे आरोप करतात. परंतु ग्रामस्थांना याची पुरेपूर जाणीव आहे .
2014 ते 2024 या कालावधीतील भोसरी विधानसभा मतदारसंघाचा तुलनात्मक अभ्यास केला, तर सर्वाधिक निधी, सर्वाधिक प्रकल्प, सर्वाधिक विकास कामे ही या मतदारसंघांमध्ये झालेली दिसून येतील. 1997 मध्ये भोसरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक गावे समाविष्ट झाली. गावे समाविष्ट झाल्यापासून विकासाची गंगा या गावांपर्यंत पोहोचलीच नाही अक्षरशः पाण्यासाठी देखील या गावांना तहानलेले राहावे लागले. मात्र 2014 नंतर खऱ्या अर्थाने विकासाची गंगा या गावांमध्ये पोहोचली आहे. यापुढेही या गावांना विकासाचा शाश्वत चेहरा देण्याचे काम करणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.