काल सिटी पोस्ट जवळ एक ट्रक खड्ड्यामध्ये गेल्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी भाजप सरकारवर टीका केली. यावर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी विरोधक पुणे शहराला बदनाम करीत आहेत अशी टीका केली.
आता आम आदमी पार्टी ने यात उडी घेतली असून मुरलीधर मोहोळ यांनी पाच प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे जाहीर आवाहन आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केले आहे.
१) पुण्यातल्या खड्ड्यावरून स्वतः राष्ट्रपतींनीच नाराजी व्यक्त केलेली आहे, मग राष्ट्रपती सुद्धा पुण्याची बदनामी करीत आहेत असे म्हणणार का?
२) पुणे शहर खड्ड्यांचे शहर, पुणे शहर वाहतूक कोंडी चे शहर ,पुणे शहर हे वाढत्या प्रदूषणाचे शहर, पुणे शहर हे कोयता गँगचे, गुंडगिरीचे शहर हे कर्तृत्व कुणाचे आहे?
३) खड्डे आणि वाहतूक कोंडी हा विषय तर स्मार्ट सिटी ची चर्चा सुरू झाली त्याच्याही आधीपासूनच आहे. मागील महिन्यात आपण स्वतः १० दिवसात सर्व खड्डे बुजवले जातील अशी घोषणा केली होती, ते खड्डे बुजले का?
४) रस्त्यावर खड्डे पडल्यास काही वर्षे त्याची जबाबदारी ही त्यात कंत्राटदारावर असेल असं कंत्राट देताना लिहून घेतलेले असते. मग कंत्राटदारांना कामाच्या दोष उत्तरदायित्व कलमा मधून सूट कोण देते?
५) शहरात नगरसेवक वा राजकारण्यांचा हस्तक्षेप पुण्यामध्ये नसताना प्रशासनही वेगळे काहीच करत नाही हा अनुभव गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये आलाच आहे. आता प्रशासनावर कुणाचे नियंत्रण आहे? ट्रिपल इंजिन सरकार पुण्यात काय करते?
पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आम आदमी पार्टीने भाजप ला घेरण्याची तयारी केली असल्याने यावर मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री काय भूमिका घेणार हा उत्सुकतेचा विषय आहे.