छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे आश्वासन
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन

पुणे : सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शिवाजीनगर पोलीस ग्राउंड येथील रिक्रिएशन सभागृहात आज करण्यात आले होते, त्यावेळी शिरोळे बोलत होते. पोलीस प्रशासन, वर्तमान पोलीस कर्मचारी आणि सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय सत्राचे आयोजन करावे अशी सूचना यावेळी शिरोळे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव, महासचिव महादेव पवार, पुणे शहर अध्यक्ष पद्माकर घनवट आदी यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने आयोजित यावर्षीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेसाठी राज्यभरातून ३६ जिल्ह्यांमधून सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असलेले अध्यक्ष व इतर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या वतीने यावेळी शिरोळे यांना सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागणीचे पत्रही देण्यात आले.

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असून हा गुंता सोडवायचा प्रयत्न करायचा असल्यास सहज शक्य असलेल्या मुद्द्यांपासून सुरुवात करून लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वास शिरोळे यांनी उपस्थितांना दिला.

आजवरच्या राजकीय जीवनात मला कधीही पोलिसांचा वाईट अनुभव आला नाही असे सांगत शिरोळे म्हणाले, “माझे वडील व पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे हे दीर्घ काळ राजकीय जीवनात कार्यरत असल्याने अनेकदा त्यांचा पोलिसांशी संबंध यायचा. एक व्यक्ती, नागरिक म्हणून त्यांच्या मनात पोलिसांबद्दल असलेला आदर, जवळीक मी अनुभविली आहे. तेच भाव माझ्याही मनात आहेत. पोलिस करत असलेले काम कायम स्मरणात असल्याने त्यांच्या भूमिकेचा मी आदर करत आलो आहे. राज्य सरकारच्या पोलीस कुटुंबीय समस्या निवारण समन्वय समितीच्या सदस्यपदी झालेली माझी निवड हे एक नागरिक म्हणून पोलीस दलासाठी काहीतरी करीत कृतज्ञतेने परतफेड करण्याची संधी आहे असे मला वाटते.”

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायमच पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी व त्यांच्यासाठी काम करण्याची तळमळ असते. पोलीस विभागातील नियम व सुविधांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासंदर्भात ते कायमच सकारात्मक असतात, त्यामुळे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवू, असेही शिरोळे यांनी सांगितले.  

आपल्या मागण्या सरकार दरबारी मान्य व्हाव्यात यासाठी आपण सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एकीचे बळ दाखवायला हवे. सेवेत असताना आम्ही एखादी तक्रार उशीरा घेतली की लागलीच आमच्यावर कारवाई होते पण निवृत्तीनंतर कित्येक महिने रखडलेल्या आमच्या मागण्या पूर्ण करताना उशीर का होतो असा सवाल यावेळी अध्यक्ष संपत जाधव यांनी उपस्थित केला. शिरोळे कुटुंबीय हे पोलिसांशी नाळ जुळलेले कुटुंब असून त्यांना आपल्या अडीअडचणी यांची माहिती व जाण आहे असेही जाधव यांनी नमूद केले.

महादेव पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सदाशिव भगत यांनी सूत्रसंचालन केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »