संवाद, पुणे, प्रबोधन विचारधारा आयोजित कोथरूड गणेश फेस्टिवलचे उद्घाटन
पुणे : आयुष्यात घडणारी पहिली गोष्ट नेहमीच खास असते. मी लिहिलेल्या ‘तू म्हणशील तसे’ या व्यावसायिक नाटकाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. पुण्यात आज होत असलेला 388वा प्रयोग आहे. कोथरूड गणेश फेस्टिवल अनेक वर्षे सुरू रहावा अशी सदिच्छा देत या फेस्टिवलमध्ये सहभागी होता यावे अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी व्यक्त केली. कोथरूडकरांना हसविणे अवघड आहे, पण नाटकाच्या माध्यमातून हसविण्याचे काम प्रामाणिकपणे करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ‘तू म्हणशील तसे’ या नाटकाच्या प्रयोगाला रसिकांच्या उदंड प्रतिसाद मिळाला.
संवाद, पुणे व प्रबोधन विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोथरूड गणेश फेस्टिवलला ‘तू म्हणशील तसे’ या नाटकाच्या प्रयोगाने आज (दि. 14) सुरुवात झाली. फेस्टिवलचे उद्घाटन संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते रसिकांशी संवाद साधताना बोलत होते. कोथरूडचे प्रथम आमदार चंद्रकांत मोकाटे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या पुणे शाखेचे संचालक सुशील जाधव, बढेकर ग्रुपचे चेअरमन प्रविण बढेकर, फेस्टिवलचे निमंत्रक, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, रवळनाथ को-ऑप फायनान्स सोसायटीचे ब्रँच मॅनेजर सुहास नाडगौडा, महेंद्र काळे, हर्षद झोडगे, पार्थ टाकळकर आदी मंचावर होते. सोमनाथ पाटील (दुबई) यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. कोथरूड गणेश फेस्टिवलचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
रसिकांशी संवाद साधताना संकर्षण कऱ्हाडे यांनी ‘आद्य दैवत गणरायाला परंपरेचा आहेर, संस्कृतीने नटलेले हे विद्येचे माहेर, सप्तसूरांच्या शर्यतीतही नवे तितकेच कैक जुने, सिद्ध होईल आज पुन्हा हे पुणे तेथे काय उणे’ ही कविता सादर केली. त्यास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
प्रास्ताविकात फेस्टिवलचे निमंत्रक सुनील महाजन यांनी संवाद, पुणेच्या उपक्रमांची माहिती दिली. कोथरूड परिसरातील चोखंदळ रसिकांसाठी विविध कार्यक्रमांचे संस्थेच्या माध्यमातून नियमित आयोजन करण्यात येते. कोथरूड गणेश फेस्टिवल हा उपक्रमही रसिकांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे. कोथरूडकरांचे निखळ मनोरंजन व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
चंद्रकांत मोकाटे म्हणाले, कोथरूडकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी या हेतूने संवाद, पुणे व प्रबोधन विचारधारा या संस्थांच्या माध्यमातून कोथरूड गणेश फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.
मान्यवरांचे स्वागत सुनील महाजन, निकिता मोघे, महेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले. संकर्षण कऱ्हाडे यांचा सन्मान चंद्रकांत मोकाटे यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी महाजन-बोरकर यांनी केले तर आभार निकिता मोघे यांनी मानले.