पिंपरी कॅम्पातील समस्या सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन सोडवा – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी मर्चंट फेडरेशन, महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांची दरमहा घेणार आढावा बैठक

पिंपरी : पिंपरी कॅम्पमधील सर्व समस्यांचे मूळ असणारा वाहतूक आणि अतिक्रमणांचा प्रश्न अग्रप्राधान्याने सोडवावा. सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन समस्यांवर तोडगा काढावा, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केल्या.

पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांची आणि पिंपरी मर्चंट फेडरेशनच्या पदाधिकारी व सभासदांची बैठक गुरूवारी रिव्हर रोड येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात खासदार बारणे बोलत होते. फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या बैठकीस पिंपरी कॅम्प व परिसरातील शेकडो व्यापारी, प्रतिनिधींसह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, या परिसरात चोरीच्या घटनांना पायबंद बसावा म्हणून पोलिसांच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही लावावेत. दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अथवा पदपथावर पथारी व्यावसायिकांना बसवून त्यांच्याकडून भाडे घेऊ नये. दुकानदार सांगतील त्या पथारी व फेरीवाल्यांवर महानगरपालिकेने कारवाई करावी.

छोट्या व्यावसायिकांना देखील व्यवसाय करणे शक्य होईल, असे समन्वयाचे धोरण सर्वांना विश्वासात घेऊन मनपा प्रशासनाने राबवावे. अशा प्रकारच्या बैठका दर महिन्यास घेऊन व्यापाऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा घ्यावा अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनास दिल्या.

खासदार बारणे म्हणाले की, व्यापाऱ्यांनी तक्रार करताच महानगरपालिकेने कारवाई करावी, परंतु जे व्यापारी छोट्या व्यावसायिकांकडून भाडे घेतात त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे. येथील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पोलीस खात्याचे सहकार्य घ्यावे. अनावश्यक ठिकाणीचे रस्ता दुभाजक काढून टाकावे.

सर्व यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे अशा सूचना देऊन बारणे यांनी व्यापारी आणि ग्राहकांना आगामी सणाच्या शुभेच्छा दिल्या.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची याबाबत ताबडतोब बैठक घेण्यात येईल. सोमवारपर्यंत सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू.

पिंपरी कॅम्प परिसरातील व्यापारी छोट्या, मोठ्या चोऱ्यांमुळे त्रस्त आहेत. या परिसरात गुंडांचा वावर आहे. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही, त्यांना कायद्याची भीती वाटत नाही, अशी तक्रार पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी केली. पिंपरी कॅम्प परिसरात दिवसा व रात्री देखील पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी केली. मनपाच्या अतिक्रमण विभागाने फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवावे. त्यांना व्यापाऱ्यांचा विरोध नाही, परंतु दुकानदारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

व्यापाऱ्यांनी आपल्या ग्राहकांना वाहने पार्किंगच्या जागेत लावण्याबाबत सूचना देऊन सहकार्य करावे. मालाची चढ-उतार करण्यासाठी ठरवून दिलेल्या वेळेतच जड वाहने मार्केटमध्ये आणावीत, अशा सूचना वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आल्या.

काल घडलेल्या चोरीच्या घटनेतील आरोपी अटकेत आहेत. व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या सूचनेनुसार योग्य पद्धतीने सीसीटीव्ही लावावे तसेच रात्रपाळीत स्वतःचा रखवालदार ठेवावा. आवश्यक असेल तर तक्रार नोंदणीसाठी थेट आपल्याशी संपर्क साधावा. कोणाच्याही दबावाला व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पिंपरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केले.

या बैठकीनंतर खासदार श्रीरंग बारणे व फेडरेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मनपा अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी पिंपरी कॅम्प परिसरातील समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »