-पिंपरी चिंचवड महाविकास आघाडी, विविध सामाजिक संघटना, समविचारी पक्ष पदयात्रा काढणार

  • बंदमध्ये सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन

पिंपरी :बदलापूर, कलकत्ता तसेच महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी ,२४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये पिंपरी चिंचवडमधील महाविकास आघाडी, विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सकाळी १० वाजता पदयात्रा काढत ‘सत्याग्रह आंदोलन’ केले जाणार आहे. या बंदमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीने केला आहे.

यासंदर्भात पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली.
बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना (उबाठा गट) शहरप्रमुख सचिन भोसले, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, मयूर जयस्वाल, विनायक रणसुभे , धम्मराज साळवे, प्रदीप पवार, रोमी संधू, विश्वनाथ जगताप, अनिल रोहम, ज्ञानेश्वर मलशेट्टी, अमर नाणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी मानव कांबळे म्हणाले, बदलापूर, कलकत्ता येथे घडलेल्या घटना निंदास्पद आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे अनेकदा अशा घटना समोर येत नाहीत. नागरिकांची हीच भीती आपल्याला या सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून घालवायची आहे. पदयात्रेने नागरिकांना विश्वास द्यायचा आहे.

शिवसेनेचे सचिन भोसले म्हणाले, महिला अत्याचाराबरोबरच राज्यात बाल अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. भाजप महायुतीचे सरकार अत्यंत अकार्यक्षम, भ्रष्ट असून या सरकारला जागे करण्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली आहे. या बंदमध्ये ‘मविआ’मधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. जनतेने देखील स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी व्हावे.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले,
हा बंद समाजात घडणाऱ्या अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी आहे. समाजातील सर्व घटकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा. अशा घटना घडल्यानंतर त्वरित कारवाईची भूमिका या सरकारची नाही. त्यामुळे गुन्हेगारांची मुजोरी वाढली आहे. अशा घटनांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »