पुणे : गायक श्रीनिवास जोशी यांचे मंत्रमुग्ध करणारे शास्त्रीय गायन, मोहिनी सांगीतिक ग्रुपने सादर केलेले हार्मोनियम- तबला – पखवाज यांच्यातील जुगलबंदी आणि भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन आदींना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर येथे द औंध सोशल फाउंडेशन व कलाश्री संगीत मंडळाच्यावतीने आयोजित भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी पंडित सुधाकर चव्हाण, द औंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत गायकवाड, पं. रामराव गुरुजी, नंदकिशोर ढोरे, सुधीर रंभाडकर, गिरीश नाईकडे, समीर महाजन, प्रणाली विचारे, सच्चिदानंद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम आदींसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पहिल्या दिवशी गायक श्रीनिवास जोशी यांनी राग मारवाने महोत्सवाची सुरुवात करीत रसिकांना भारावून टाकले. तर अभंग ‘पंढरी निवासा सखा पांडुरंग’ गात आपल्या गायनाची सांगता केली. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. त्यांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे, तबल्यावर पांडुरंग पवार, तर पखवाजवर गंभीर महाराज यांनी संगीत साथ केली.

संगीतातील अनोख्या प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेल्या मोहिनी वाद्यवृंद ग्रुपने आपल्या सादरीकरणाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. गायिका रुचिरा केदार यांनी सतारवादक साहाना बॅनर्जी यांच्यासमवेत राग मारू बिहागमध्ये ‘परी मोरी नाव’ बंदिश सादर करीत रसिकांची वाहवा मिळवली. तसेच प्रसिद्ध बंदिश ‘तरपत रैना दिन’, त्यानंतर राग मेघ व देस सादर करत रसिकांची मने जिंकली. तदनंतर ‘बीत जात बरखा ऋतु सजन नही आये’ ही बंदिश राग देसमध्ये सादर केली. तसेच मिया मल्हारही सादर केला. अनुजा बोरुडे यांनी पखवाजावर त्रिताल, सावनी तळवलकर यांनी तबल्यावर ताल त्रिताल सोलो वादन केले. अदिती गरडे (हार्मोनियम) यांनी संगीत साथ देत रसिकांनी मने जिंकली. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘माझे माहेर पंढरी अभंगा’ने आपल्या सादरीकरणाची सांगता केली.
महोत्सवात पहिल्या दिवसाची सांगता गायक भुवनेश कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग जोग कंस विलंबित तालामध्ये सादरीकरण केले. तसेच राग खमाजमध्ये ठुमरीवर ‘सावरा मायी सावरा’ सादर करीत रसिकांची मने जिंकली. त्यांना हार्मोनियमवर अभिनय रवंदे यांनी, तर तबल्यावर प्रशांत पांडव यांनी संगीत साथ केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »