‘
पिंपळे सौदागरमधील सोसायट्यांचा बारणे यांना पाठिंबा
पिंपळे सौदागरलाही होणार मेट्रोची सुविधा उपलब्ध – बारणे
पिंपळे : पहिल्या टप्प्यात पिंपरी- चिंचवडचा स्मार्ट प्रकल्पात समावेश नव्हता. विशेष पाठपुरावा करून आपण तो समावेश करवून घेतला. त्यामुळे पिंपळे सौदागर भागाचा कायापालट झाला. नजिकच्या भविष्यात वाकडहून चाकणला जाणारी मेट्रो पिंपळे सौदागर भागातून जाणार असल्यामुळे या भागाचा विकास अधिक गतिमान होईल, असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी व्यक्त केला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपळे सौदागर भागातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल शिवार गार्डन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल तथा नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले की, केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पिंपळे सौदागर भागाचा कायापालट झाला आहे. पुढील टप्प्यामध्ये वाकड ते चाकण या मार्गावर मेट्रो सुरु होणार आहे. हा मार्ग पिंपळे सौदागरमधून जाणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनाही मेट्रो सुविधा उपलब्ध होणार आहे.
देहूरोड- कात्रज बाह्यवळण रस्त्यावर सुमारे 6,600 कोटी रुपये खर्चून देहूरोड ते बालेवाडी दरम्यान साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे किवळे, रावेत, पुनावळे, वाकड या भागातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असे बारणे यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती त्यांनी दिली.
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन नाना काटे यांनी केले. पिंपळे सौदागरमधील मतदार कायम विकासाच्या पाठीशी राहतो. त्यामुळे बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास प्रशांत शितोळे यांनी व्यक्त केला.
या बैठकीत रॉयल इम्पिरिओचे भागवत झोपे, चव्हाण, साई पर्लचे पराग त्यागी, विजय, फाईव्ह गार्डनचे श्रीकांत सारडा, रमेश चिंचलकर, रोझलँड रेसिडेन्सीचे संदीप ठेंगरे, संतोष म्हसकर, अभिजीत देशमुख, साई आंगणचे शरद जाधव, कुणाल आयकॉनचे नरेंद्र देसाई, राजवीर पॅलेसचे संतोष मिश्रा, रॉयल रहाडकीचे इंद्रजीत पवार, श्रीजी विहारचे संतोष जगदाळे, मनमंदिर सोसायटीचे क्षीरसागर तसेच श्री. बिंद्रा आदींची भाषणे झाली.
खासदार बारणे व नाना काटे यांनी आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांनी धन्यवाद दिले. बारणे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.