निगडी : प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघ व श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने मराठी नववर्षानिमित्त आयोजित मनोमीलन समारंभात ज्येष्ठ नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली.

सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर आर. एस. कुमार, भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस अनुप मोरे, प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अर्चना वर्टीकर, श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे तसेच भारती फरांदे शर्मिला बाबर, किसन महाराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सूर्यकांत मुथियान यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. मतदान कोणालाही करा पण विचारपूर्वक करा, उमेदवाराचे काम पाहून करा, असे आवाहन बारणे यांनी यावेळी केले.

मतदान करताना देशहिताला प्राधान्य द्या. संसदेच्या संरक्षण विषयक स्थायी समितीमध्ये काम करताना देशाच्या सीमांवर जाण्याची संधी आपल्याला मिळाली. रक्ताचा थेंबही न सांडता पंतप्रधान मोदी यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करून दाखवले. त्यामुळे त्या भागात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्याचबरोबर देशाचा मोठ्या प्रमाणात पैसाही वाचला आहे, याकडे बारणे यांनी लक्ष वेधले.

मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे संपूर्ण जगात भारताचा दरारा निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये देशाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. या सर्वांचा विचार करून मतदारांनी आपला हक्क बजावावा, असे आवाहन बारणे यांनी केले.

पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रोच्या कामास सुरुवात झाली आहे. पुढील टप्प्यात निगडी ते मुकाई चौक, किवळे, रावेत मार्गे वाकड पर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती बारणे यांनी दिली. खासदार म्हणून मतदारसंघात केलेल्या विविध कामांचा थोडक्यात आढावाही त्यांनी सादर केला.

उमा खापरे, सदाशिव खाडे, शंकर जगताप आदींची ही यावेळी भाषणे झाली. बाळा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »