निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये महाराष्ट्राच्या ५७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक २६,२७ व २८  जानेवारी, २०२४ दरम्यान एमएडीसी मिहान यांच्या सेक्टर १२अ , १४ व १५ , पतंजली फूड फॅक्टरी जवळ, सुमठाणा, ता.हिंगणा, जि.नागपूर येथील विशाल मैदानांवर आयोजित होणार आहे. मानवी जीवन अंतर्मनातील शांतीसुखाने परिपूर्ण करत विश्वामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा कल्याणकारी संदेश जनमानसापर्यंत पोहचविणे हाच या संत समागमाचा उद्देश आहे.

या भव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी ‘स्वेच्छा सेवांचे’ विधिवत उद्घाटन परम आदरणीय श्री.मोहन छाबड़ा, मेंबर इंचार्ज, प्रचार प्रसार, संत निरंकारी मंडळ यांच्या शुभहस्ते रविवार, दि.२४ डिसेंबर, २०२३ रोजी नागपूरसह संपूर्ण विदर्भ तसेच पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत हर्षोल्हासपूर्ण वातावरणात करण्यात आले.


 या प्रसंगी मंडळाच्या वित्त विभागाचे मेंबर इंचार्ज श्री.जोगिंदर मनचंदा, डॉ.दर्शन सिंह, कॉर्डिनेटर, प्रचार प्रसार, समागम समितीचे चेअरमन श्री.शंभुनाथ तिवारी, समन्वयक श्री.किशन नागदेवे, सेवादलचे केन्द्रीय अधिकारी सर्वश्री गुलेरिया आणि सुरेंद्र दत्ता आदि मान्यवर उपस्थित होते. समागम समितीच्या इतर सदस्यांसह राज्यभरातील सेवादलाच्या क्षेत्रीय संचालकांनी सेवादल स्वयंसेवकांसह या समारोहामध्ये भाग घेतला.


स्वेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी पूज्य श्री मोहन छाबड़ा जी यांनी आपले भाव व्यक्त करताना म्हटले, की सद्गुरूच्या असीम कृपेने यावर्षी नागपूर नगरीत महाराष्ट्राचा ५७वा वार्षिक निरंकारी संत समागम आयोजित होत असून केवळ नागपूरमधीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भाविक भक्तगणांसाठी  सेवेची ही एक अमूल्य संधी प्राप्त झालेली आहे. ते पुढे म्हणाले, की अशा प्रकारच्या संत समागमांचे आयोजन सद्गुरुच्या दिव्य दृष्टीकोनानुसार मानवाला मानवाशी जोडण्यासाठी केले जात असते. मनुष्य जेव्हा आपले नाते ईश्वराशी जोडतो तेव्हा तो सहजपणे समस्त भेदभावांच्या पलिकडे जातो आणि विश्वबंधुत्वाच्या धाग्यात गुंफला जातो. समागमाचे हे पर्व मानवाला ब्रह्मानुभूतीद्वारे आत्मानुभूती करुन स्वत:चा दर्जा उंचावण्याची सुसंधी प्रदान करत असते ज्यायोगे मनुष्य स्वत: सुंदर जीवन जगून धरती साठी सुद्धा एक वरदान बनून जातो.
           

उल्लेखनीय आहे, की महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमांची परंपरा फार जुनी आहे. महाराष्ट्राचा पहिला निरंकारी संत समागम मुंबईतील सुप्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर १९६८ मध्ये आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून सुरु झालेली समागमांची ही श्रृंखला तब्बल ५२ समागमांपर्यंत मुंबई महानगरीतील विविध मैदानांवर चालू राहिली. २०२० मध्ये महाराष्ट्राचा ५३वा संत समागम पहिल्यांदाच मुंबईबाहेर नाशिक नगरीमध्ये आयोजित करण्यात आला. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षे हे आयोजन व्हर्च्युअल रुपात करण्यात आले व मागील वर्षी ५६वां संत समागम छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आला. यावर्षी ५७वा संत समागम आयोजित करण्याचे सौभाग्य नागपुर नगरीला प्राप्त झाले आहे.


 अलिकडेच समालखा येथे आयोजित ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर सालाबादप्रमाणे भक्तगण महाराष्ट्राच्या निरंकारी संत समागमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. स्वाभाविकपणेच ५७व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये सहभागी होण्यासाठी भक्तगण अत्यंत उत्सुक झाले आहेत. हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठया तन्मयतेने पूर्वतयारीमध्ये योगदान देण्यास सज्ज झाले आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »