पुणे : जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशी वाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा, चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पट कथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे. ‘पेईंग गेस्ट’, ‘धमाल’, ‘ऑल द बेस्ट’, ‘पोस्टरबॅाईज’, ‘टोटल धमाल’ या हिंदी चित्रपटांच्या लेखनासोबतच टिव्ही मालिका, नाटकांसाठी लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन करणाऱ्या परितोष पेंटर यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला आहे.
डिटेक्टिव्ह म्हणून काहीतरी वेगळे करू इच्छिणारे तीन मित्र. त्यातल्या एकाला बघता येत नाही, एकाला ऐकू येत नाही आणि एक बोलू शकत नाही. त्यांच्यातील या कमतरतेमुळे त्यांची नेहमीच फटफजिती होते. मात्र ते डगमगत नाहीत तर परिस्थितीला सामोरे जात एकत्र उभे ठाकतात. आपल्यातील ही मैत्री जपत एका फसवणुकीचा हे तीन मित्र कसा निकाल लावतात? याची धमाल दाखविणारा ‘अफलातून’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय.
श्री, आदि आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. या फसवणुकीच्या प्रकारणाचा छडा लावताना अनेकदा गुंतागुंती उद्भवतात व यातून बाहेर पडताना या तिघांची होणारी त्रेधातिरपीट लेखक दिगदर्शक परितोष पेंटर यांनी अत्यंत खुबीने दाखविली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा रेशम टिपणीस, अशी कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहेत.
‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत कश्यप सोमपुरा आणि मलिक वार्सी यांचे आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस यांचे आहे. वेशभूषा मीनल डबराल गज्जर हिची असून कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए.एफिल्म्स ने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर, शीला जगताप, अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत.ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहेत.
‘अफलातून’ २१ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.