मराठी सिनेमांच्या विविधांगी आशय आणि विषयांची भुरळ नेहमीच जगभरातील सिनेप्रेमींना पडली आहे. अनेकदा याच बळावर मराठी चित्रपट जगातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारतात आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांवर आपलं नाव अगदी सहजपणे कोरण्यात यशस्वी होतात. मराठी सिनेमांची हिच काहीशी अनोखी परंपरा पुढे नेणाऱ्या ‘ताव’ या आगामी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. मुहूर्तानंतर लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

एव्हीसी प्रोडक्शन अंतर्गत श्वेता साबळे आणि कोनिका विजय चव्हाण यांची निर्मिती असलेल्या तसेच विजय चंद्रकांत चव्हाण यांची प्रस्तुती असलेल्या ‘ताव’ चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मुळशी तालुक्यात असलेल्या राजमुद्रा हॅाटेलमध्ये पार पडला. या सोहळ्याला चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन भरत राज करत आहेत. डिओपी संजीवकुमार सी. हिल्ली या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करत असून दिनेश सावंत ( राजेंद्र ) कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळणार आहेत. मराठी भाषा वळेल तशी वळते असं म्हणतात ते काही खोटं नाही. आता ‘ताव’ या चित्रपटाच्या टायटलबद्दलच बोलायचं झालं तर, या शब्दामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत.

त्यापैकी कोणता अर्थ या चित्रपटाच्या टायटलसाठी अभिप्रेत आहे याबाबतचं रहस्य सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. मनोरंजक विषय, मुद्देसूद पटकथालेखन, अर्थपूर्ण संवादलेखन, कसदार अभिनय, सुमधूर गीत-संगीत, नेत्रसुखद लोकेशन्स, सुरेख कॅमेरावर्क, अफलातून सादरीकरण आणि अत्यंत बारकाईनं केलेलं दिग्दर्शन ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्य ठरणार आहेत.

‘ताव’ चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप रिव्हील करण्यात आलेली नाहीत. लेखकाने कागदावर उतरवलेली पटकथा रसिकांना जशीच्या तशी रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार असून, निर्मितीमूल्यांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची ग्वाही निर्मात्यांनी यावेळी बोलताना दिली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »