पुणेचॉकलेट हिरो, ब्युटी क्वीन हिरोईन, चित्रपटभर प्रेम, शेवटी खलनायकाशी फायटिंग आणि पुढे आयुष्यभर हिरो-हिरोईनचा सुखी संसार! सामान्यपणे मराठीच नव्हे, तर हिंदी आणि इतर भारतीय चित्रपटसृष्टींमध्ये हाच फॉर्म्युला दिसून येतो. पण काही चित्रपट हे अशा साचेबद्ध चौकटी मोडून त्यापलीकडे विषयाची मांडणी करू पाहतात. कथानक वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक साचेबद्ध चौकट मोडणारा मराठी चित्रपट ‘अंब्रेला’ येत्या ९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय! विषयाच्या वेगळ्या मांडणीची प्रेक्षकांची भूक या चित्रपटातून नक्कीच भागेल!
ग्रामीण कथानक असणाऱ्या चित्रपटांमध्ये गावचा रांगडा पाटील, त्याची दुष्कृत्य आणि त्यातून गावकऱ्यांना होणारा जाच अशा मांडणीची सवय झालेल्या मराठी सिनेरसिकांना या चित्रपटात मात्र सरप्राईज मिळणार आहे. अभिनेता अभिषेक सेठीया आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांच्यातल्या प्रेमाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहेच. पण अरुण नलावडे आणि सुहिता थत्ते यांच्या कसदार अभिनयाची मेजवानीही प्रेक्षकांना चित्रपटाचा पुरेपूर आनंद देणारी ठरेल.
आपल्या आदर्शांची जबाबदारी समर्थपणे पेलणारी भूमिका अरुण नलावडेंनी लीलया पार पाडली आहे. पण त्याचवेळी त्यांच्या आदर्शांना नव्या पिढीकडून मिळालेलं आव्हान पेलताना होणारी घालमेलही चित्रपटाच्या कथानकाला खऱ्या अर्थाने जिवंत करते. अभिषेक आणि हेमल यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ठरतील यात शंकाच नाही!
चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, संवाद आणि पटकथा लेखन मनोज विशेंनी केलं आहे. अजय गोगावले, सुनिधी चौहान, केके. आनंद शिंदे, नकाश अजीज, भारती माधवी अशा एकाहून एक सुरेल आणि मनात रुंजी घालणारे आवाज या गाण्यांना लाभले आहेत. स्वरनादची प्रस्तुत या चित्रपटाची गाणी मंगेश कंगणे यांनी लिहिली असून ती संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केली आहेत.
नीलेश सतीश पाटील, सार्थक अधिकारी आणि आशिष ठाकरे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले-सहाय यांनी चित्रपटाचं संपादन केलं आहे. मुख्य सहायक दिग्दर्शनाची जबाबदारी भूषण चौधरी यांनी सार्थपणे पेलली आहे. महेश गौतम, दलजीत सनोत्रा यांनी साऊंड इफेक्ट्सवर काम केलं आहे. राहुल आणि संजीव यांनी कोरिओग्राफी केली आहे. सुदेश देवान आणि तन्वीर मीर यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे. विशाल पाटील चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत. तर आय फोकस स्टुडिओनं पोस्ट प्रोडक्शन केलं आहे.