सेवावार्धिनी संस्थेच्या वतीने तीन दिवसीय जलदूत उपक्रमाचा समारोप समारंभ संपन्न
जलव्यवस्थापन व जलसंवर्धन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि जलदूत यांचा सन्मान

पुणे : पाणी हा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. आज जेव्हा आपण जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन या विषयांवर बोलतो तेव्हा आपल्या पूर्वजांनी यासंदर्भात वापरलेल्या पद्धती व केलेले उपाय यांचा विसर आपल्याला पडला असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मात्र आजच्या काळात जलसंवर्धनाच्या क्षेत्रात शाश्वत कार्य करावयाचे असल्यास कौशल्याधारीत मनुष्यबळ गरजेचे असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ नितीन करमाळकर यांनी केले.

सेवावर्धिनी या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या जलदूत २.० या जलसंधारणातील पथदर्शी उपक्रमाचा समारोप कार्यक्रम आज बाणेर रस्त्यावरील यशदा येथील सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. सेवावर्धिनी संस्थेचे सचिव सोमदत्त पटवर्धन, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, यशदाच्या जल साक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, जलदूत या संपूर्ण प्रकल्पाला आर्थिक मदत करणाऱ्या अॅटलास कॉप्को कंपनीचे कॉर्पोरेट एचआर प्रमुख कबीर गायकवाड, कंपनीच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) विभागाचे व्यवस्थापक अभिजित पाटील आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

‘जलदूत’ हा सेवावर्धिनीचा जल संधारणातील एक पथदर्शी प्रकल्प असून गेली १३ वर्षे संस्था संपूर्ण राज्यभरात २५ गावांमध्ये जलसंधारण क्षेत्रात कार्यरत आहे. २०१५ ते १७ या काळात संस्थेच्या वतीने जलदूत १ तर २०१९ ते २३ या कालावधीमध्ये जलदूत २.० हे दोन्ही प्रकल्प अॅटलास कॉप्को या कंपनीच्या सक्रीय व आर्थिक सहभागाने संपन्न झाले. जलदूत २.० प्रकल्पात तब्बल २१ सहयोगी संस्था सहभागी झाल्या होत्या याशिवाय एकूण ३ विद्यापीठे, विविध शासकीय आस्थापनांचा सहभाग हे जलदूत २.० चे खास वैशिष्ट्य होते. या सर्व संस्था व जलदूत यांचा सहभाग असलेला तीन दिवसीय कार्यक्रम नुकताच यशदा येथे संपन्न झाला. यावेळी जलपूजन करीत कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली. सेवावर्धिनीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘जलदूत- पथिक शाश्वत विकासाचा’ या पुस्तिकेचे प्रकाशन देखील यावेळी संपन्न झाले.

याबरोबरच हरिदास राऊत, कृष्णा राऊत मुरूमहाटी, ता त्रिंबक, जि नाशिक (प्रथम क्रंमाक), योगेश गावित, अजित गावित रगतविहिर, ता सुरगणा, जि नाशिक (द्वितीय क्रमांक), मधुकर गागरे, किरण सूर्यवंशी कानडगाव, ता राहुरी जि अहमदनगर (तृतीय क्रमांक) या जलदूतांनी त्याच्या गावांमध्ये केलेल्या कार्याचा सन्मान करीत त्यांना पारितोषिके देण्यात आली. तर वनवासी कल्याण आश्रम, नाशिक (प्रथम क्रमांक), संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, नांदेड (द्वितीय क्रमांक), नवी उमेद, पांढरकवडा, यवतमाळ (तृतीय क्रमांक) या स्वयंसेवी संस्थांना देखील गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकास रु. दीड लाख, द्वितीय क्रमांकास रु. १ लाख तर तृतीय क्रमांकास रु ७५ हजार रुपयांचा धनादेश देत या वेळी गौरविले गेले.

याप्रसंगी बोलताना डॉ. करमाळकर म्हणाले, “आपल्या देशात धोलावीरा सारख्या ठिकाणी असलेली सुमारे २५०० हजार वर्षे जुनी जलव्यवस्थापन व जलसंवर्धन पद्धती आपल्या पुढच्या पिढीला शिकविण्याची गरज आहे. पुढच्या पिढीला ही माहिती देण्याबरोबरच या क्षेत्रात शाश्वत प्रयत्न देखील व्हायला हवेत. या दृष्टीने कौशल्याधारित प्रशिक्षणार्थी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. हेच नेमके काम सेवावर्धिनी करीत आहे याचा मला अनंद आहे. आज आपल्या देशातील नद्यांचे असलेले स्वरूप हे भयावह आहे. याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शास्त्रीय संशोधनात्मक अभ्यासासोबतच पारंपरिक ज्ञानाची सांगड घालत काम करणे गरजेचे आहे.”

आज केंद्र सरकार नव्या शैक्षणिक धोरणावर काम करीत आहे. यामध्ये जलव्यवस्थापन, जलसंवर्धन आणि जलदूत यांचा अंतर्भाव कसा करता येईल यावर आम्ही नक्की काम करू, असे आश्वासन यावेळी डॉ. करमाळकर यांनी दिले. सेवावर्धिनी सारख्या सेवाभावी संस्थांचे कार्य आणि गरज यांचे महत्त्व देखील यावेळी डॉ. करमाळकर यांनी नमूद केले.

पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता व शाश्वतता हे महत्त्वाचे विषय हाती घेत सेवावर्धिनीच्या पुढाकाराने सुरू असलेला जलदूत प्रकल्प स्थानिक पातळीवर कामांना बळ देतो इतकेच नाही तर योग्य प्रशिक्षणाच्या जोरावर जलदूतांना प्रशिक्षित करण्याचे कामही आपण करतो. याचाच एक भाग म्हणून गावांमध्ये सर्वसंमिलीत जलसमिती कार्यरत झाल्या आहेत. यात जलदूतांचा सहभाग प्रशंसनीय आहे. स्वतःच्या गावापुरतेच काम न करता शेजारील गावातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असल्याचे प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले. कोणत्याही सामाजिक कार्यात क्षमतावर्धन हे महत्त्वाचे असून शासकीय पातळीवरील आपल्या कामाचा अनुभव डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितला. तर सामाजिक काम हे लोक सहभागाशिवाय शाश्वत राहत नाही ही खंत आनंद पुसावळे यांनी बोलून दाखविली.

‘भारत’ आणि ‘इंडिया’मधील दरी कमी करण्याबरोबरच प्रशिक्षणाची मूलभूत गरज लक्षात घेत आम्ही सेवावर्धिनी संस्थेचा मदत केली. स्वतः सोबतच आपले सहकारी, गावकरी, शेजारील गावातील नागरिक या सर्वांना सोबत घेत इतरांनाही मदत करीत उत्कर्ष करण्याचा भाव या प्रकल्पामध्ये आम्हाला जाणवला असे कबीर गायकवाड यांनी नमूद केले.

सेवावर्धिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर हर्षन पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सोमदत्त पटवर्धन यांनी आभार मानले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »