– पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ‘माई परिवार’ तर्फे यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

– वैभव जोशी, दत्तप्रसाद रानडे यांच्या ‘सोबतीचा करार’ कार्यक्रमाचे सादरीकरण

पुणे : पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत आज (ता. ४) ‘यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा’ संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांचा आणि माईंना आवडणारा ‘सोबतीचा करार’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.

अनाथांच्या माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ‘यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्षीचा हा पुरस्कार अमरावतीतील मेळघाटमधील डॉ. रविंद्र व डॉ. स्मिता कोल्हे यांना, तसेच पुण्यातील पुरंदरमधील डॉ. मनिषा गुप्ते आणि डॉ. रमेश अवस्थी यांची महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ ‘मासूम संस्था’ यांना प्रदान करण्यात आला. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि उद्योजक अशोक (आबा) खाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘माईंच्या पहिल्या स्मृतिदिनी आम्हाला हा पुरस्कार मिळावा ही आमच्यासाठी पाठिवरची थापही आहे आणि आज माईंची उणीवही भासते. माईंचं बोट धरून आम्ही मेळघाटात आलो आणि अविरत काम केलं, याची प्रेरणा माईच देऊ शकतात’, असं मत डॉ. स्मिता कोल्हे यांनी मांडलं.

‘अभिमन्यूला जे बाळकडू मिळालं नाही, ते आम्हाला माईंकडून मिळालं. त्याग आणि वैराग्य यांचा योग्य समन्वय माईंमध्ये होता. माईंच्या अनेक लेकरांपैकी आम्हीही आहोत’, असं मनोगत पुरस्कार्थी समाजसेवक डॉ. रविंद्र कोल्हे यांनी व्यक्त केले.

माईंनी लाखो लेकरांवर प्रेम केलं. त्यातला मी एक आहे, अशा भावना अशोक खाडे यांनी व्यक्त केलं.

माई परिवामध्ये मला हक्काने सामवून घेतलं, त्याबद्दल आभार. माईंच्या स्मृतिदिनी त्यांचा वारसा, त्यांचं काम पुढे घेऊन जाणाऱ्या लोकांना सन्मानित केल्याबद्दल माई परिवाराचं कौतुक, अशा भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

‘पुरस्कार कोणाला द्यायचा यावर माई परिवारात खूप चर्चा झाली. या चर्चेतून, माईने जिथे कामाला सुरुवात केली त्या मेळघाटातील डॉ. कोल्हे दाम्पत्य आणि माईने जिथे आपली संस्था उभी केली त्याच पुरंदर तालुक्यातील मासूम संस्थेचे नाव पुढे आले. मागील एक वर्षात माई परिवाराला अनेक चढ-उतारांना सामोरे जावं लागलं. मात्र अशाही परिस्थितीत अनेक मदतीचे हात आपल्या परिवाराला मिळाले, त्यांची मी ऋणी आहे’ असे मत आपल्या प्रास्ताविकात सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या आणि त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी मांडले.

कार्यक्रमाला देवकी पंडित, भारती आचरेकर, उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार सोहळा पार पडला.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »