स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा.फौजिया खान, प्रदेशाध्यक्षा सौ विद्याताई चव्हाण,खा.वंदनाताई चव्हाण यांनी समताभुमीतील स्मारकस्थळी अभिवादन केले.
“भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, स्फुर्तीनायिका, ज्ञानाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केल्याने समाजात अमुलाग्र असा बदल घडण्यास मदत झाली. तत्कालीन समाजातील चुकीच्या रूढी, परंपरा बदलण्यासाठी शिक्षण हेच एकमेव प्रभावी मध्यम असल्याने जोपर्यंत घरातील स्त्री शिक्षित होत नाही तोपर्यंत समाजात बदल घडविणे अशक्य असल्याचे फुले दांपत्याने ओळखले होते.
मुलींच्या पंखात आज,आकाशात झेपावण्याचे बळ आहे !
हे सावित्रीबाईंनी केलेल्या कार्यकर्तुत्वाचेच फळ आहे !!
समाजात बदल घडवायचा असेल तर त्याची सुरूवात स्वत:पासून करावी लागते, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास. वयाच्या १३ व्या वर्षी महात्मा जोतिबा फुले यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना गुरू मानून सावित्रीबाईंनी शिक्षण घेण्यास सुरूवात केली. समाजातील रूढी-परंपरांविरोधात जाऊन त्या केवळ एकट्या शिक्षीत बनल्या नाहीत तर संपूर्ण महिलावर्गासाठी शिक्षणाची दारे उघडण्यासाठी जिद्दीने लढल्या आणि आपल्या या लढ्यात यशस्वीही झाल्या” , असे मत यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.