लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचे विचार
विश्वकर्मा यांच्या नावाने उभारण्यात आालेल्या डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ डिझाईनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

पुणे : “युवकांची बुध्दिमत्ता, नवनिर्मिती, संशोधन, आत्मविश्वास, आवड, कठोर परिश्रम यामुळे भारत विश्वगुरू बनेल. देशातील युवक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या योगदान देत आहेत. युवकांच्या शक्तिनेच सर्व ठिकाणी मोठी क्रांती झाली आहे. त्यात तांत्रिक, आध्यात्मिक, सामाजिक किंवा वैज्ञानिक क्रांतीचा समावेश आहे.” असे विचार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे कोथरूड येथे विश्वकर्मा यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ डिझाइन या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.

खासदार श्रीनिवास पाटील आणि एशियन हेरिटेज फाउंडेशनचे प्रमुख, प्रसिद्ध डिझाइनर पद्मभूषण राजीव सेठी हे सन्माननीय अतिथी म्हणून होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, माईरचेे संस्थापकीय विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, माईरच्या व्यवस्थापकीय कमिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड चाटे, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. तपन पांडा आणि डॉ. गुरूप्रसाद राव उपस्थित होते.

ओम बिर्ला म्हणाले,“ आजच्या काळात नेतृत्व, लोकशाही आणि शासन या वर जास्त भर आहे. नेतृत्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते प्रत्येक क्षेत्रात असावे. प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात नेतृत्व केले पाहिजे आणि प्रभावी नेतृत्वगुण विकसित करावे. प्रशासनात नेतृत्व मजबूत असेल तर जबाबदारी आणि पारदर्शकता सर्वत्र मजबूत होईल.”

“ जिथे शांतता असते तेथे अधिक प्रभावीपणे आणि आत्मविश्वासने काम केले जाते. वसुधैव कुटुम्ब कम ही संकल्पा मानणार्‍या भारताने जगासमोर कोणतेही आव्हान असल्यास त्यावर उपाय शोधण्याचा सक्रिय प्रयत्न केला आहे. अलिकडच्या काळात कोविड १९ साथीच्या रोगाचे उदाहरण घेता येईल. आता संशोधनाच्या क्षेत्रात ही आपण आघाडी घेतली पाहिजे आणि भारताला संशोधन केंद्र बनविण्याच्या दृष्टिने कार्य करावे.

भविष्यात प्रत्येक नवकल्पनेचा जन्म आता भारतात व्हावा.”
राजीव सेठी म्हणाले,“ भारतीय डिझाइन तंत्र आणि प्राचीन प्रगतीबद्दल अधिक समजून घेणे आवश्यक आहे. तसेच कलेचा नवा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. डिझाइनची आजची संकल्पना केवळ रचना, कला किंवा संगीत एवढीच नाही, तर ती या सर्व घटकाची एक पद्धत आहे. आम्हाला सामाजिक मानसिकता म्हणून डिझाईनला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
शिकणे हे भारतीय संस्कृतीचे देणे आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये डिझाइनला महत्वाचे स्थान असून डिझाइन ही बाह्य स्थिती नाही तर ती आतून येणारी उत्तम कला आहे. डिझाइन ही एक सामुहिक यात्रा बनने गरजेचे आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,“ प्रत्येकाने स्वतःच्या जीवनाची रचना शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतीय तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृती यांचा अभ्यास करून त्या जीवनात उतरवावे. एकदाका तुम्हाला जीवनाची रचना समजली की तुम्ही स्वतःला सकारात्मक पद्धतीने तयार करू शकता. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संबंध हा डिझाइनशी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात डिझाइन शोधण्याचा प्रयत्न करावा. ज्यामुळे आपले जीवन समृध्द होईल. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचे भूमिका सर्वात महत्वाची असेल.”

राहुल कराड म्हणाले,“भारतीय डिझाईन आणि परंपरेला जगासमोर आणण्याच्या दृष्टिने सर्वांना कार्य करावयाचे आहे. याच दृष्टिने कार्य करतांना डॉ. विश्वनाथ कराड यांनी जगातील सर्वेत्कृष्ट घुमटाची निर्मिती केली आहे. ज्या लोकांच्या तत्वावर हा समाज चालतो अश्या ५४ लोकांचे पुतळे बसविण्यात आले आहे. वर्तमानकाळात वसाहतवादी मानसिकता बदलून इंडियाला भारत संबोधणे या दृष्टिने सर्वांनी पाऊले उचलावी.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गुरूप्रसाद राव यांनी आभार मानले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »