प्रसिद्ध लेखिका स्मिता मिश्रा
पुणेः- तात्पुरत्या राजकीय स्वार्थापोटी काही राजकीय पक्षांनी राष्ट्राचे दिर्घकालीन नुकसान करुऩ ठेवले आहे. २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील, भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांचा चेहरा वापरून आतंकवादाचा जिहादी चेहरा लपवण्यासाठी हिंदू दहशतवाद ही खोटी संकल्पना मांडली गेली, असे खेदाने नमूद करावेसे वाटत असल्याचे मत ‘ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड’ या पुस्तकाच्या प्रसिद्ध लेखिका स्मिता मिश्रा यांनी व्यक्त केले.
२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील, भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर आधारित आणि स्मिता मिश्रा लिखित ‘ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड’ या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याचे माजी पोलीस आयुक्त निवृत्त डीजीपी जयंत उमराणीकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी मनोगत व्यक्त करतांना लेखिका स्मिता मिश्रा बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर प्रकाशिका रेणू कौल वर्मा उपस्थित होत्या. मनोगतानंतर झालेल्या संवादात्मक कार्यक्रमात मान्यवरांनी यावेळी मनमोकळी मत मांडली. संवादात्मक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी केले.यावेळी सीए रणजीत नातू, सीए धनंजय बर्वे आणि प्रसाद पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
लेखिका स्मिता मिश्रा म्हणाले, हे पुस्तक लिहून मला काय मिळाले, मी हे पुस्तक लिहलेच नसते तर काय फरक पडला असता असे अनेक प्रश्न मला विचारले गेले. परंतु मी हे पुस्तक लिहले नसते तर हिंदू दहशतवाद ही एक संकल्पना खरच आस्तित्वात होती असा पुढील पिढीचा भ्रम झाला असता, हा भ्रम होऊ नये आणि त्यासाठी योग्य साहित्य आणि दस्तावेज त्यांच्या मदतीसाठी हाताशी असावा म्हणुन मी हे पुस्तक लिहिले. अनेक पातळ्यांवर मी दबाव आणि दहशत सहन केली तसेच भावनिक पातळीवर अनेक समस्यांना मला सामोरे जावे लागले. परंतु मला भारतीय असल्याचा अभिमान असल्यामुळेच मी हे पुस्तक लिहिले.माझ्या जीवाचे काही बरे -वाईट होण्याआधीच मला हिंदू दहशतवाद ही खोटी संकल्पना स-प्रमाण खो़डून काढायची होती. हिंदू दहशतवाद नावाची संकल्पना अस्तित्वात नसताना एकच खोटे सातत्याने सांगितल्याने येणा-या पिढीला कदाचित ही संकल्पना खरी देखील वाटू शकली असती. माध्यमांनी देखील जबाबदारीचे भान बाळगणे आवश्यक असून ब्रेकिंग देण्याच्या नादात आपण काही चुकीचे तर देत नाही आहोत ना याची खातरजमा करणे आवश्यक आहे. पूर्वी वृत्तपत्रांमध्ये आणि वाहिन्यांमध्ये संपादकांची चाळणी असायची, परंतु समाज माध्यमांच्या रेट्यामुळे ही चाळणी थोडी कमकुवत झाली आहे असे जाणवते. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल, इंटरनेट आणि समाज माध्यमांसारखे शस्त्र हाती आले असल्याने प्रत्येक व्यक्ती एक प्रकाशक झाला आहे.
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त निवृत्त डीजीपी जयंत उमराणीकर म्हणाले, पोलिसांना अधिकार दिले परंतु त्या अधिकाराच्या अंमलबजावणीत अनेक कायदेशीर अडथळे निर्माण करुन ठेवले आहेत. राजकारणी आणि सर्वसामान्य जनता या कात्रीत तो सापडला असून पोलीसांना अधिकार वापरण्यात थोडे स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. मुळात पोलिसांच्या अधिकारांवर जी गदा आणली जाते त्याबाबत जनतेनेच मागणी लावून धरत पोलिसांच्या अधिकारांमध्ये कोणी हस्तक्षेप किंवा ढवळा ढवळ करणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
प्रकाशिका रेणू कौल वर्मा यांनी पुस्तक प्रकाशनामागची भुमिका विषद केली. सीए रणजीत नातू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
छायाचित्र ओळीः- स्मिता मिश्रा लिखित ‘ले. कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड’ या पुस्तकाचे प्रकाशन करतातंना डाविकडून सीए रणजीत नातू,सीए धनंजय बर्वे, निवृत्त मेजर गौरव आर्य , पुण्याचे माजी पोलीस आयुक्त निवृत्त डीजीपी जयंत उमराणीकर सेखिका स्मिता मिश्रा आणिप्रकाशिका रेणू कौल वर्मा.