मराठी फिल्म इंडस्ट्रीत असे बरेचसे कलाकार आहेत, जे गरीब कुटुंबातून आले आणि त्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अशा दिग्गज मराठी अभिनेत्यांचा यात समावेश होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याची ओळख करून देणार आहोत ज्याने स्वकर्तुत्वाने या इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. 


मित्रांनो, प्रितम पाटील दिग्दर्शित ‘ढिंशक्यावSS’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातूनही एक असाच नवा चेहरा समोर येणार आहे. अहेमद देशमुख (Ahemad Deshmukh) असे या अभिनेत्याचे नाव असून या सिनेमातून तो मराठी फिल्म इंडस्ट्रीत पहिले पाऊल टाकणार आहे.

अहेमद देशमुख हा अत्यंत हलाखीची परिस्थिती पाहिलेल्या लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू गावातील शेतकरी कुटुंबातला मुलगा. आई-वडील, ४ बहिणी, २ भाऊ असे त्याचे कुटुंब. अहमदचे बालपण गोरगरिबीतच गेले. वडिलांची शेतीच्या व्यवसायातून जास्त कमाई होत नव्हती मात्र अशा परिस्थितीतही अहेमदने आपले शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, काही वर्षे त्याने वडिलांना शेती करण्यात मदतही केली. 

अ हेमदचा लहान भाऊ अपंग असल्याने कुटुंबाची अधिकतर जबाबदारी अहेमद आणि त्याच्या मोठ्या भावावर आली. शेतातील छोटी-मोठी कामे करणे, इतरांकडे ट्रॅक्टरवर काम करणे, विहीरीत क्रेन चालवणे अशी कामे देखील त्याला करावी लागली. परंतु काहीतरी मोठं करण्याचं अहेमदचं स्वप्न त्याला स्वस्थ राहू देत नव्हतं. एकतर नेता किंवा अभिनेता बनायचं हे अहेमदने लहानपणीच ठरवले होते आणि याच स्वप्नासाठी अहेमदने गाव सोडून मुंबईत जाण्याचा निश्चय केला. मुंबईला निघालेला अहेमद मिळेल ते काम करू लागला. परंतु  फार काळ तो तिथे टिकू शकला नाही. त्यामुळे नाईलाजाने त्याला गावी परतावे लागले. 

पुढे काही दिवस अहेमदने मोठ्या भावाच्या गॅरेजमध्ये काम केले. तिथून काम शिकल्यानंतर अहेमदने स्वत:चे गॅरेजही चालू केले. पुढे ट्रॉली, शेड बनवणे असे व्यवसाय देखील त्याने केले. याचवेळी त्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता बनून त्याने लोकांची अनेक कामे मार्गी लावत असताना यादरम्यान आपली अभिनयाची आवडही त्याने जोपासली.

राजकारणात असतानाच त्याच्या लक्षात आले की आपल्यामध्ये नेत्यापेक्षा अभिनेत्याचे जास्त गुण आहेत. दरम्यानच्या काळात तो अधूनमधून वेळ काढून मुंबई, पुण्याला ऑडिशन देण्यासाठी जात असे. तिथे त्याच्या अभिनयाचे कौतुकही होत असे. परंतु कोणत्या सिनेमात अभिनय करण्याची संधी मात्र त्याला मिळत नव्हती. पण ते म्हणतात, हर किसी का दिन आता है. अगदी तसेच एके दिवशी अहेमदची दिग्दर्शक प्रितम पाटील यांच्याशी भेट झाली आणि मराठी सिनेसृष्टीला एक नवा तारा मिळाला. अशाप्रकारे एका सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा अहेमद देशमुख याला मराठी फिल्म इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला. आता ढिंशक्यावSS चित्रपटात अहेमद देशमुखचा अभिनय पाहणे औत्सुक्याचे असेल.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »