“खेळामध्ये आज उज्वल करिअर आहे आणि त्यामध्ये आपल्यास हवे असलेले सर्वकाही मिळू शकते परंतु कोणत्याही खेळात यशस्वी होण्यासाठी संयम, सातत्य आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे तसेच यशस्वी होण्याची नितांत इच्छा देखील मनात असावी लागते.” असे प्रतिपादन फ्री स्टाईल कुस्तीपटू आणि सुवर्णपदक विजेती गीता फोगाटने एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या ‘एल्प्रो स्पोर्ट्स फेस्ट 2.0’ या वार्षिक क्रीडा कार्यक्रमात केले.
त्या पुढे म्हणाल्या “महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे फक्त महिलांनी ती शक्ती ओळखून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक शक्तिशाली महिलाच एक शक्तिशाली पिढी घडवू शकते.”
एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या ‘एल्प्रो स्पोर्ट्स फेस्ट 2.0’ या वार्षिक क्रीडा कार्यक्रमात सर्व वयोगटातील अनेक क्रीडा रसिकांची भेट घेतली. 23 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या क्रीडा महोत्सवात हजारो स्पर्धकांनी क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, तिरंदाजी, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, खो-खो, टग ऑफ वॉर आणि लांब उडी यांसारख्या क्रीडा क्रियाकलापांमध्ये भाग घेतला आणि स्पर्धा केली.
कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी गीता फोगाट यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांनी नंतर सहभागींशी संवाद साधला, त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांनी विविध स्पर्धात्मक खेळ कसे जिंकले याबद्दल सांगितले. आपल्या देशाचा अभिमान असलेल्या सर्वात बलवान आणि दृढनिश्चयी खेळाडूंपैकी गीता फोगाट यांच्याशी संवाद साधताना विद्यार्थी खूप आनंदी दिसत होते. आपल्या आदर्श खेळाडू सोबत वावरताना विद्याथ्यांच्या डोळ्यात एक चमक दिसून येत होती.
इव्हेंटमध्ये बोलताना डॉ अमृता वोहरा – डायरेक्टर प्रिन्सिपल, एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, म्हणाल्या “खेळ हे निर्विवादपणे पुरुष-प्रधान क्षेत्र आहे, विशेषत: मुख्य खेळ जे सर्वाधिक चाहते आकर्षित करतात.त्यामुळे आमच्या तरुण मुलांनी अधिकाधिक क्रीडा महिलांना भेटणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. एल्प्रो स्पोर्ट्स फेस्ट 2.0 मध्ये गीता फोगाट ने येऊन आमचा सन्मान वाढवला त्याबद्दल आम्ही अत्यंत नम्र आणि सन्मानित आहोत. तिला पाहण्यासाठी, तिचे बोलणे ऐकण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील तिच्या लहानपणापासूनचे काही मजेदार अनुभव शेअर करण्यासाठी विद्यार्थी खूप उत्सुक होते.एल्प्रो स्पोर्ट्स फेस्ट 2.0 च्या माध्यमातून आमचा उद्देश तरुणांशी बोलणे, टीमवर्क, स्वावलंबन आणि लवचिकता या सर्व मूल्यांना शिकवणे हे आहे. नामवंत खेळाडू आणि महिला ज्यांनी त्यांच्या क्रीडा प्रवासात अनेक पुरस्कार आणि पदके मिळवली आहेत, तेच आम्हाला आमच्या मुलांमधील समान उद्दिष्टे आणि महत्त्वाकांक्षा दृढ करण्यास मदत करतात.”