महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे पहिल्यांदाच पुणे शहरात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सर्जिकल स्ट्राइक करत त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत निषेदाच्या व मुर्दाबादच्या घोषणा दिल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट देण्यात आली.
याबाबत बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , “छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असणाऱ्या पुणे जिल्ह्यात व कर्मभूमी असणाऱ्या पुणे शहरात महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा विना -निषेध विना- धिक्कार वावर होणे हे आम्हा शिवछत्रपतींच्या मावळ्यांना रुचणारे नव्हते. त्यामुळेच आज त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशारा राजभवनास आम्ही दिलेला होता.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आमचे आंदोलन दडण्यासाठी कलम १४९ अन्वये आम्हास नोटीस बजावली होती. तसेच सुमारे शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज फाटा सकाळी ०७.०० वाजताच माझ्या वानवडीतील निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला होता. मला ताब्यात घेण्याचा किंवा स्थानबद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्याने ही संभाव्य परिस्थिती ओळखून सकाळी साडेसहा वाजताच गनिमी काव्याने मी घर सोडले होते.
राजभवनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार दुपारी ठीक साडेबारा वाजता आम्ही राजभवनाच्या बाहेर दाखल झालो, राजभवनाच्या गेट जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते- पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाचे व्यापक स्वरूप व आक्रमकता पाहता पुणे शहर पोलिसांनी आम्हास विनंती केली , त्यानुसार आमच्यापैकी काही प्रतिनिधींना राजभवनात राज्यपालांना भेटण्यासाठी सोडण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार अवमानास्पद विधाने करणाऱ्या राज्यपालांना आम्ही इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांची काही पुस्तके भेट देण्यासाठी घेऊन गेलो. राज्यपालांची भेट झाल्यानंतर आम्ही ती पुस्तके देत शिवाजी महाराज कोण होते..? , याबाबतची माहिती घेऊन त्यांच्या बाबतचा खरा इतिहास वाचूनच इथून पुढे महाराजांबद्दल वक्तव्य करावे अशी सूचना केली.
यावेळी राजभवनात झालेल्या वीस मिनिटांच्या बैठकीत राज्यपालांनी त्यांच्याकडून छत्रपती शिवरायांबद्दल झालेल्या चुकीच्या स्टेटमेंट बद्दल जवळपास चार ते पाच वेळेस दिलगिरी व्यक्त केली. तसेच पुन्हा त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही याची ग्वाही देखील त्यांनी दिली. आम्ही देखील राज्यपालांना स्पष्ट शब्दात सांगितले की,” केवळ आपल्या घटनात्मक पदाचा व वयाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेधाचे आंदोलन करत आहे. जर पुन्हा अशा प्रकारचे कृत्य आपल्याकडून झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापेक्षा अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल”, असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिला.
पुणे शहर ही छत्रपती शिवरायांची भूमी असणाऱ्या पावन शहरात राज्यपालांचा हा उन्माद खपवून घेतला जाणार नाही असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यपालांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आम्ही दिला, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी व्यक्त केले.
या आंदोलनासाठी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी, रुपाली पाटील,किशोर कांबळे, सुषमा सातपुते,संदीप बालवडकर,महेश हांडे, दीपक कामठे,रोहन पायगुडे, ॲड.विवेक भरगुडे, स्वप्निल जोशी, कुलदीप शर्मा आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.