‘फतवा’ ९ डिसेंबरला चित्रपटगृहात

पुणे : आयुष्यात एकदा का होईना प्रत्येकजण प्रेमात पडतोच. कुणाचं प्रेम अनंत अडचणीतून यशस्वी होतं, तर कुणाला प्रेम मिळतच नाही. प्रेम’ हा मध्यबिंदू ठेवून दोन प्रेमवीरांची कथा मांडणारा ‘फतवा हा चित्रपट येत्या ९ डिसेंबरला रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. या चित्रपटातील प्रेमकथेला संगीताची उत्तम साथ देत प्रेमाचा वेगळा पैलू उलगडून दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रतिक गौतम याने ‘फतवा’ या संगीतमय प्रेमपटातून केला आहे. ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत या संगीतप्रधान चित्रपटातून प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर येत आहे. डॉ. यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

प्रेमासाठी त्याग, संघर्ष आणि काहीही करायची तयारी असणाऱ्या रवी आणि निया यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनंतर त्यांच प्रेम कोणतं वळण घेत? हे वळण त्यांना एकत्र आणणार की वेगळं करणार? हे दाखवतानाच प्रामाणिक प्रयत्न ‘फतवा’ चित्रपटातून करण्यात आला आहे. या नव्या जोडीसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे, अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकार ‘फतवा’ मध्ये दिसणार आहेत.

वेगवेगळ्या ढंगातील सहा गाणी या चित्रपटात आहेत. बाबा चव्हाण यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध कलेली ‘अलगद मन’, ‘प्रेमाचा गोंधळ’ ही दोन गाणी चित्रपटात असून ‘अलगद मन’ हे मनस्पर्शी गीत गायिका पल्लक मुच्चल यांनी गायलं आहे. तर ‘प्रेमाचा गोंधळ’ हे रांगडेबाज गीत गायक नंदेश उमप यांच्या पहाडी आणि दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या लेखनीतून उतरलेलं ‘चोरू चोरून’, ‘सजनी दोघं एक होऊ’ या प्रेमगीतांना अभय जोधपूरकर, वेदा नेरुरकर यांचे मधूर स्वर लाभले असून संजीव-दर्शन यांनी या गीतांना संगीत दिले आहे. गीतकार अमोल देशमुख यांनी गीतबद्ध केलेलं ‘पुन्हा पुन्हा’ या भावप्रधान गाण्याला सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. प्रतीक गौतम प्रवीण पगारे, सिद्धार्थ पवार यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. अराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेलं ‘अली मौला’ ही कव्वाली साबरी ब्रदर्स यांनी गायली आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे.

‘फतवा’ चित्रपटाची कथा प्रतिक गौतम यांची आहे. छायांकन दिलशाद व्ही. ए. तर संकलन फैजल महाडिक, इमरान महाडिक यांचे आहे. कला योगेश इंगळे तर साहसदृश्य कौशल मोजेस यांची आहेत. रंगभूषा प्रताप बो-हाडे तर वेशभूषा वर्षा यांची आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

९ डिसेंबरला ‘फतवा’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »