. डेमॉक्रसी अँड कॉर्पोरेटोक्रसी’ (लोकशाही आणि उद्योगशाही)

पुणे : जगातील सर्वात मोठी लोकशाही, हे बिरूद सार्थ करायचे असेल, तर देशात लोकशाही शासनप्रणाली आणि उद्योगविश्‍व यांच्यात परस्परपूरक असे संबंध निर्माण करणे आवश्यक आहे. तेव्हाच सत्ताकेंद्राचा समतोल योग्य पद्धतीने राखला जाईल, असे मत मान्यवरांनी शुक्रवारी येथे मांडले.भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ ग्वहर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पिस यूनिव्हर्सिटी आयोजित भारतीय छात्र संसदेच्या दुसर्‍या दिवशीच्या दुसर्‍या सत्रात ‘डेमॉक्रसी अँड कॉर्पोरेटोक्रसी’ (लोकशाही आणि उद्योगशाही) या विषयावरील परिसंवादात अनेक मान्यवर सहभागी झाले होते.


हरियाणा विधानसभेचे सभापती ग्यानचंद गुप्ता, उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज, वैद्यकीय शिक्षण व अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना, भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या संगीता घोष, आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या आणि पक्षाच्या सोशल मिडिया आणि डिजिटल व्यासपीठाच्या प्रमुख सुप्रिया शिरनाटे, फिल्ममेकर, शिक्षणतज्ञ, लेखक, प्रकाशक आणि पत्रकार परनजोय गुहा ठाकुरता आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष एन. गोपालस्वामी यांनी या परिसंवादात भाग घेतला.


खन्ना म्हणाले,‘कोणत्याही प्रकारचे लॉबिंग होऊ नये, याचे भान ठेवून धोरणात्मक निर्णय घेतले जातात. बड्या कंपन्या, लघुउद्योग सर्वांना समान संधी दिली जाते. आजारी उद्योगांना मदतीचा हात दिला जातो. युवकांनी राजकारणाचा करिअर म्हणून विचार केला पाहिजे,.घोष म्हणाल्या,‘राजकारणातील घराणेशाहीचा जणु शाप आपल्या लोकशाहीला आहे. देशहीत आणि कुटुंबहित, यामध्ये कुटुंबाला झुकते माप मिळत असल्याची टीका त्यांनी केली.


शिरनाटे म्हणाल्या,‘विशिष्ट उद्योगपती आणि उद्योगसंस्थांची मक्तेदारी देशात निर्माण होऊ पाहते आहे. प्रसारमाध्यमे, सोशल मिडियादेखिल त्यांच्या प्रभावाखाली येत आहे.लोकशाही शासनव्यवस्थेला हे छेद देणारे आहे. त्यामुळे सत्तेचे केंद्र राजकीय पक्षांकडून उद्योगपतींकडे सरकण्याचा धोका आहे.


परनजोय गुहा ठाकुर्ता म्हणाल्या, लोकशाही प्रणाली, निवडणुका यामध्ये होणार्‍या प्रचंड आर्थिक व्यवहारांविषयी शंका व्यक्त केली. राजकीय सत्ता आणि उद्योगसत्ता, यांच्यात वाढते साटेलोटे असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

संजयसिंग म्हणाले,‘देशवासियांचा पैसा घेऊन पोबारा करणार्‍या उद्योगपतींकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यांनी पळवलेला पैसा इथल्या सर्वसामान्यांचा आहे. शिवाय त्यामुळे संभाव्य रोजगार, लघुउद्योग यांच्या शक्यता नाहीशा झाल्या. सरकारी मालकीच्या कंपन्यांचे खासगीकरणही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर युवकांनी राजकारणापासून दूर न जाता, या प्रवाहाचा एक भाग बनावे, असे आवाहन त्यांनी केले.


एन.गोपालस्वामी यांनी परिसंवादाचा समारोप करताना लोकशाही आणि उद्योगशाहीतील परस्पर संबंधांवर भाष्य केले. लोकशाहीने उद्योगांच्या निकट जाणे धोक्याचे असते. निवडणुकीत होणारे आर्थिक व्यवहार पारदर्शक नसतात. भविष्यात आपण केवळ बिगेस्ट लोकशाही न राहता, बेस्ट लोकशाही बनण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.


यावेळी आदर्श युवा विधायक सन्मान मध्यप्रदेशच्या धार विधानसभा मतदारसंघाचे डॉ. हीरालाल अल्वा, पॉडिचेरीचे आमदार रिचर्ड्स जॉनकुमार, उत्तरप्रदेशच्या जौनपूरच्या आमदार डॉ. रागिणी सोनकर यांना तर उच्चशिक्षित आदर्श युवा सरपंच सन्मानमहाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोटी गावच्या सरपंच भाग्यश्री लेकामी, पंजाबच्या जालंदर जिल्ह्यातील बोलिना गावचे सरपंच कुलविंदर बाघा आणिजम्मूकाश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील मंजाकोटे गावच्या सरपंच समरीन खान यांना प्रदान करण्यात आला. डॉ. पौर्णिमा बागची आणि कुमार अभिनव यांनी सूत्रसंचालन केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »