छात्र संसदेच्या ५
‘समाजमाध्यमांच्या आर्थिक व्यवहारांमध्येही पारदर्शकता गरजेची’

आदर्श युवा विधायक सन्मान राजस्थानच्या डुंगरपूर येथील भारतीय ट्रायबल पार्टीच्या राजकुमार रावत यांना प्रदान

पुणे : माध्यमांवरील अतिरिक्त गदारोळ कमी करण्यासाठी माध्यमांचे महसूल मॉडेल बदलण्याची गरज आहे. तसेच सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवरील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार मनीष तिवारी यांनी शनिवारी मांडले.

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिची आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या पाचव्या सत्रात ‘भारतीय माध्यमे – रूल्ड बाय नॉईज ऑर रूल्ड बाय लॉ’ या विषयावरील चर्चेत खासदार तिवारी बोलत होते.

इंडिया टुडे (हिंदी) चे संपादक सौरभ द्विवेदी, कू चे संस्थापक अध्यक्ष अप्रमेय राधाकृष्ण, प्रसिद्ध पत्रकार आशुतोष, कवयित्री, सामाजिक कार्यकर्ती शर्मिला इरोम, कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अंशुल अविजित आणि प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांनी यावेळी विचार मांडले . एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष डा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस याप्रसंगी उपस्थित होते.

‘माध्यमे जोवर जाहिरातींच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत, तोपर्यंत अपेक्षित पारदर्शकता दिसणे कठीण आहे,’ असे सांगून तिवारी म्हणाले,‘समाजमाध्यमांची गती, प्रभाव लक्षात घेता, ही व्यासपीठे अधिक काळजीपूर्वक आणि संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज आहे. पण सध्या समाजमाध्यमे म्हणजे खोटेपणा, दिशाभूल करणारी वक्तव्ये, चुकीची माहिती यांची विद्यापीठे बनली आहेत. इतरांच्या मतांचा अनादर वाढत आहे, असहिष्णुतेचे प्रमाण अधिक आहे. हे चित्र बदलण्यासाठी माध्यमांनी रेव्हेन्यू मॉडेल आमूलाग्र बदलण्याची गरज आहे,.

द्विवेदी म्हणाले,‘वाढत्या गदारोळातील नेमका ‘आवाज’ ऐकण्याची आज गरज आहे. पत्रकार, प्रशासक, राजकीय नेते, शिक्षक..या साऱ्यांना योग्य ते प्रश्न विचारण्यासाठी समाजमन प्रगल्भ करणे, ही माध्यमांची जबाबदारी आहे. परस्परविरोधी मतांचाही आदर करायला शिकणे आणि लोकांना शिकवणे, हे माध्यमांचे काम आहे. माध्यमे ही जबाबदारी पार पाडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे,’.

अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले,‘भारतातील समाजमाध्यमांचा प्रसार आणि गती, हा चिंतेचा विषय वाटावा, अशी परिस्थिती आहे. बहुसंख्य समाजमाध्यमांची मालकी विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. समाजमन प्रभावित करणे किंवा स्वत:चा अजेंडा रेटणे, हे त्यांचे हेतू असतात. नजिकच्या काळात प्रत्येक देशाचे स्वत:ची स्वतंत्र समाजमाध्यम व्यासपीठे असतील,’.

आशुतोष म्हणाले,‘आपल्याला समृद्ध परंपरा, तत्त्वज्ञानाचे संचित लाभले आहे. पण शांंततेचे महत्त्व आपल्याला समजले नाही, तर फक्त गदारोळच उरतो, तसे सध्याचे चित्र आहे. माध्यमांवरील आरडाओरडा त्याचेच द्योतक आहे. आपण माध्यमे ‘समजून’ घेणे आवश्यक आहे. एकेकाळी ‘आवाजा’नेच समाजाला जागृत केले आहे. रणगर्जना, सत्याग्रहाची चळवळ, क्रांतिकारकांच्या घोषणा हे ‘आवाज’च होते, पण तो गदारोळ नव्हता. यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे.

शर्मिला म्हणाल्या,‘विद्यार्थ्यांनी सत्याची ताकद समजून घेतली तर ते भविष्यात चांगले नेते बनू शकतील.

डॉ. अंशुल यांनी माध्यमे आणि संसद यात सामंजस्य आवश्यक असल्याचे मत मांडले. आजच्या माध्यमांच्या गदारोळात गरीब, आदिवासी, शोषित यांचा आवाज कुठेच दिसत नाही. तो ऐकूू आला पाहिजे,.

सरदेसाई यांनी आपल्या लोकप्रिय गीताची झलक ऐकवली. ‘प्रसिद्धी, पैसा यांच्या मागे धावण्याची हाव सोडली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

—–

चौकट

या सत्रादरम्यान आदर्श युवा विधायक सन्मान राजस्थानच्या डुंगरपूर येथील भारतीय ट्रायबल पार्टीच्या राजकुमार रावत यांना प्रदान करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कौशल साहू, दिशा करमचंदानी, कृतिका देशपांडे, परिधी शर्मा यांनी मनोगत मांडले.

डॉ. गौतम बापट, चयनिका बसू आणि स्नेहा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. अनामिका विश्वास यांनी स्वागत केले

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »