पुणे : भारतीय जनता पक्षासोबत आज अनेकजण जोडले जात असून, जगातला सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. आता ज्यू बांधव देखील भारतीय जनता पक्षाशी जोडले जात असल्याने, पक्षासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुण्यातील ज्यू बांधवांनी आज येथील लाल देऊळ येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर संघटनमंत्री राजेश पांडे, पुणे मनपा सभागृह नेते गणेश बिडकर, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख, उपाध्यक्ष अली दारुवाला, डॅनियल पेनकर, सोलोमॉन सोफेर, डॉ. जॉर्ज जुडाह, डॉ. इरान जुदाह, एतियात पेनकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आज संपूर्ण देशात ११ कोटींपेक्षा जास्त भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. २०१४ मध्ये मोदीजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी पक्षाला १७ कोटी मते मिळाली. २०१९ मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी पक्षाला २२ कोटी मतं मिळाली. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने २०२४ मध्ये पक्षाला ३० कोटी मते मिळतील. देशातील १८ राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे अशा सर्वात मोठ्या पक्षात आपण प्रवेश करत आहात, याचा अतिशय आनंद होतो आहे. पक्षामध्ये आपला नेहमीच सन्मान होईल. तसेच आपल्या प्रश्नांचा पाठपुरावा करुन, ते सोडवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी पाटील यांनी ज्यू धर्मीय बांधवांच्या १६ व्या शब्बाथ प्रर्थनेला उपस्थिती लावली.