पुणे : पर्यावरणाचा होणारा र्‍हास हि समाजासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. यावर लवकरच उपाय शोधला नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. यासाठी तरुण पिढीमध्ये पर्यावरणासंदर्भात जागृती करणे गरजचे असून यादृष्टीने लघुपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभासले यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पुणे महापालिका, माय अर्थ फाऊंडेशन, सस्टेनेबल इनिशिएटिव्ह, एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि ध्यास प्रतिष्ठान तर्फे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. दिग्दर्शक नितिन सुपेकर, लिज्जत पापड उद्योग समूहाचे संचालक सुरेश कोते, पुणे मनपा पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, ईसीआयचे सदस्य दत्तात्रय देवळे, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे विरेंद्र चित्राव, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, वनराईचे सचिव अमित वाडेकर, संयोजक अनंत घरत, अमोल उंबराजे, ललित राठी सोमनाथ पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

दत्तात्रय देवळे म्हणाले, पूर्वी घरातला कचरा घरातच जिरवून त्याचे खत तयार होत असे. आज जागा कमी झाली आणि माणसांची संख्या वाढल्याने पर्यावरणाच्या समस्या वाढल्या आहेत.

नितीन सुपेकर म्हणाले, लघुपट हे पर्यावरणाची जागृती करण्यासाठी अत्यंत महत्वाचे साधन आहे. हे माध्यम तरुणांच्या अधिक जवळचे असल्याने त्यामधून अधिक प्रमाणात जागृती होऊ शकेल.

सुरेश कोते म्हणाले, कचर्‍याची समस्या अधिक गंभी होत आहे. कचर्‍याचे योग्य नियोजन झाले नाही तर पुणे शहराच्या काही भागात ज्याप्रमाणे कचर्‍याचे प्रश्न बिकट झाले आहेत, त्याप्रमाणे संपूर्ण देशात चित्र निर्माण होईल.

पुणे महापालिकेने कचर्‍याची विल्हेवाट कशी लावावी यासाठी तयार केलेल्या संकल्प हा लघुपट आणि पी. के भांडवलकर यांचा मांजा हा लघुपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ ठरले. अ‍ॅडिक्शन या लघुपटासाठी अक्षय वासकर यांना सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. सुनील डांगे यांच्या अवनी हा सर्वोत्कृष्ठ माहितीपट ठरला. प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट या लघुपटाची संकल्पना सर्वोत्कृष्ठ ठरली. हितेंद्र सोमानी यांचा सुरक्षित भविष्य हा लघुपट सर्वोत्कृष्ठ अ‍ॅनिमेशनपट ठरला. जीवाश्म या लघुपटासाठी जितेंद्र घाडगे यांना सर्वोत्कृष्ठ संवादलेखनाचे पारितोषिक मिळाले. सचिन मंगज यांना हिरवी आशा लघुपटाच्या छायाचित्रीकरणासाठी पारितोषिक मिळाले. गिफ्ट, अदृश्य आणि कचरा विलगीकरण या लघुपटांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

सोमनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनंत घरत यांनी प्रास्ताविक केले. अमोल उंबराजे यांनी आभार मानले. ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव यांनी महोत्सवाच्या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम पाहिले.

सोमनाथ पाटील, ध्यास प्रतिष्ठान

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »