
पुणे : पुणे मनपा सेवकांची वसाहत असलेले सानेगुरुजी नगर येथील 17 चाळी मध्ये राहणाऱ्या 453 सेवकांच्या कुटुंबियांनी त्यांची राहती घरे मालकीची होण्यासाठी पालिकेवर धडक मोर्चा काढला. वारंवार मागणी करून प्रशासन या बाबीकडे लक्ष देत नसल्याने या भागातील नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे परत एकदा प्रशासनाला जाग येण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

गेल्या साठ वर्षापासून चारशे 53 कुटुंब या भागात राहतात. या भागांमध्ये एकूण 17 चाळी आहेत. या वसाहतीमध्ये तीन भाग आहे. यात पूरग्रस्त चाळी, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, तसेच लीव्ह लायसन्समध्ये असणारे कुटुंब या वसाहतीमध्ये राहतात. राहती घरे मालकी हक्काची होण्यासाठी सानेगुरुजी नगर मनपा वसाहत बचाव कृती समिती गेल्या पस्तीस ते 40 वर्षांपासून संघर्ष करीत आहे. यामध्ये याच वसाहतीतील मनपा सेवकांच्या सायंतारा व ओम शांती या दोन सोसायट्यांना अशा प्रकारची मान्यता दिली आहे.

तेथे 45 सभासद घेण्यात देखील आले. यामधील एकही रहिवाशी सानेगुरुजी नगर मधील रहिवासी नव्हता. या बाबीकडे मनपा प्रशासनाने लक्ष दिले नाही. प्रत्येक वेळी विराजमान आयुक्तांनी प्रस्तावाला कचऱ्याची टोपली दिली. त्यामुळे आता तरी आम्हाला न्याय मिळावा या मागणीसाठी येथील रहिवाशांनी मोर्चा काढला असल्याची माहिती द पब्लिक व्हॉईस ला दिली.



शासकीय स्तरावर सानेगुरुजी नगर वसाहत येथील शंभर घरे उभारण्यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती येथील रहिवाशांना मिळाली. तरी अजून रहिवाशांना मात्र याबद्दलची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळेच हा त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळावीत यासाठी वेळोवेळी पालिकेवर मोर्चा काढला जातो.

त्यानंतरही जर पालिकेने या मागणीकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी सानेगुरुजी नगर मनपा वसाहत बचाव कृती समितीचे धनंजय जाधव महेश पन्हाले गणेश सातपुते यांनी दिली.