चंद्रकांतदादांनी ब्राह्मण समाजाचा उल्लेख केला नसल्याचा आमदार मुक्ता टिळक यांचा दावा.

पुणे : काल सिंधूदुर्ग येथे झालेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेमके काय बोलले याचा नीट अभ्यास करावा आणि मग दादां विरुद्ध आंदोलन करावे असा सल्ला भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी दिला आहे.
चंद्रकांतदादांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला ही देशाच्या मुख्य प्रवाहात कसे सामावून घेतले याचा उल्लेख करताना वस्तुस्थिती मांडली ते म्हणाले की ” आत्ताचे मुसलमान हे काही बाबराचे वंशज नाहीत बाबर आला आणि गेला, तसेच आपल्याकडे ही दाते गाडगीळ अशी आडनावे असलेले मुस्लिम आहेत.


ते मूळचे इथलेच – कोणीतरी आक्रमक आला आणि ते धर्मांतरित झाले असा दादांच्या वक्तव्याचा अर्थ आहे मात्र त्यांच्या बोलण्याचा अन्वयार्थ काढायचा आणि निरर्थक वाद निर्माण करायचा याला एका सुनियोजित षडयंत्राचा वास येतो आहे असे ही त्या म्हणाल्या.

चंद्रकांतदादा जे म्हणाले तो इतिहास असून या देशात आलेल्या परकीय आक्रमकांनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडविले व सध्याचे मुस्लिम बांधव हे त्याचाच वंश आहेत म्हणून अद्यापही आपल्याकडे इतर समाजातील अनेक तत्सम आडनावे मुस्लिम समाजात आढळतात असा त्यांच्या वक्तव्याचा साधा सरळ अर्थ आहे.
मात्र या विषयाचे भांडवल करुन ब्राह्मण समाजाच्या मनात द्वेष पसरविण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचे ही आ.मुक्ता टिळक यांनी म्हंटले आहे व हे प्रकार थांबवावेत असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
