बी. जी. शिर्के उद्योग समूह आणि इंडो शॉटले कंपनीचा पुढाकार
पुणे : राम मंदिर निर्माणासाठी प्रत्येक जण पुढे सरसावलेला आहे. ज्याला जमेल ती मदत करण्यात सर्व पुढे येत आहे यातच बी. जी. शिर्के उद्योग समूह आणि इंडो शॉटले कंपनी यांच्यावतीने देखील राम मंदिर निर्माण यासाठी तब्बल दोन कोटी 51 लाखाची मदत करण्यात आली.
या पुण्यातील प्रथितयश कंपन्यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी समर्पित केला. सुप्रसिद्ध उद्योजक अजय शिर्के, विजय शिर्के यांनी एक कोटी 51 लाख रुपयांचा निधी आणि सुप्रसिद्ध उद्योजक श्री. विजय पुसाळकर यांचे चिरंजीव श्री. रोहन पुसाळकर यांनी एक कोटी रुपयांचा असा एकूण दोन कोटी 51 लाख रुपयांचा निधी राम मंदिर निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या कडे सुपूर्द केला.
यावेळी सह सरकार्यवाह कृष्ण गोपालजी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सचिव चंपतरायजी, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री विनायकराव देशपांडे, महाराष्ट्र कि‘केट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यावेळी उपस्थित होते.
‘मनामनातील राम जागवून राष्ट्र मंदिर घडवूया’ या विचाराला अनुसरुन देशभरातील अनेक उद्योजक आणि दानशूर मंडळी राम मंदिराच्या निर्मितीसाठी सढळ हाताने सहयोग देत आहेत ही निश्चितच अभिनंदाची बाब आहे. याच भावनेतून शिर्के आणि पुसाळकर यांनी दिलेल्या निधीतून राष्ट्रीय कर्तव्याची पूर्तता केल्याची भावना व्यक्त होते असे विचार भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.
अजय शिर्के म्हणाले, ‘समाजातील विविध चांगल्या कामांसाठी मदत करणे हे भारतीय परंपरेत सामाजिक कर्तव्य मानले जाते. याच परंपरेला अनुसरुन श्रीराम मंदिर निर्माणासाठी आम्ही निधी समर्पित करुन या कार्यात सहभाग घेतला आहे. एका राष्ट्रीय कार्यात सहभागी झाल्याचा अनुभव या निमित्ताने आम्ही घेत आहोत.’
रोहन पुसाळकर म्हणाले, ‘राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने देशभर निधी संकलन अभियान सुरू आहे. प्रत्येक भारतीयाने श्रीराम मंदिर निर्माणासाठी सहयोग द्यावा या संकल्पनेतून आम्ही या सांस्कृतिक कामासाठी निधी समर्पित केला.’