पुणे : निसर्गाने काही लाख वर्षापुर्वी सजीवांना जन्म दिला, पशु, पक्षी, प्राणी मानव एकत्रित गुण्या गोविंदाने राहत होते. मात्र मानवाने त्याच्या बुद्धीचा वापर करुन नवनवीन गोष्टी सुरु केल्या आणि तेथूनच पर्यावरणाच्या –हासाची सुरुवात झाली. जे निसर्गात घडतंय ते कृत्रिमरित्या घडवण्याची मानवाची बुद्धी आहे त्यामुळे मानवालाच भोगावे लागत आहे. पाणी प्रदुषित केल्यामुळे साथीचे आजार निर्माण झाले, पर्यावरणाला धक्का लावल्यामुळेच मानवाला आज त्याचे दुष्परिणाम सोसावे लागत आहेत. पर्यावरण जपत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती केली गेली पाहिजे असे मत भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.

‘कोविड-१९’ महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘आरोग्य आणि पर्यावरणा’चं महत्त्व उलगडून दाखवणारा ‘आरोग्य आणि पर्यावरण’ या विषयावर वनराई मासिकाचा यंदाचा वार्षिक विशेषांक प्रकाशित करण्यात आला. या विशेषांकाचे प्रकाशन भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. गिरिष बापट, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन तसेच कोहिनूर ग्रूपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, सचिव अमित वाडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वनराईचे मुख्य प्रकल्प संचालक जयवंत देशमुख यांनी केले. खा. गिरिष बापट म्हणाले कि, माणूस प्रकृतिकडून विकृतीकडे चालला आहे, हे दुर्दैव आहे. मात्र त्याला पुन्हा प्रकृतीकडे म्हणजेच निसर्गात आणावेच लागेल. कोरोनासारख्या रोगामुळे माणूस निसर्गापुढे किती तुच्छ आहे हे कळाले. पर्यावरणाचा असमतोल होत आहे, भविष्यात उत्तम पर्यावरण राहण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.

स्वच्छ, हरित आणि समृद्ध भारत घडवण्याच्या ध्यासातून स्थापन झालेली ‘वनराई’ संस्था गेल्या साडेतीन दशकांपासून वनीकरण, जल-मृदा संधारण, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. पद्मविभूषण डॉ. मोहन धारियाजींनी सुरू केलेली ही संस्था आपल्या ‘वनराई’ मासिक अंकातून अनेक मूलभूत प्रश्नांवर जनजागृती घडवून आणते. प्रशासन, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालयं आणि नागरिक अशा प्रत्येकालाच ‘आरोग्य आणि पर्यावरणा’च्या दिशेनं ठोस पावलं उचलण्यासाठी हा विशेषांक मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी कार्यक्रमाची माहिती देताना व्यक्त केला.

‘विद्यापीठ अनुदान आयोगा’चे (UGC) उपाध्यक्ष मा. डॉ. भूषण पटवर्धन यांचे अतिथी संपादकपद या विशेषांकाला लाभले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे, ज्येष्ठ नेत्रविकारतज्ञ डॉ. तात्याराव लहाने, ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’चे वरिष्ठ संशोधक डॉ. बाबासाहेब तांदळे, ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे’चे वरिष्ठ संशोधक डॉ. कृष्णा खैरनार, ‘राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थे’च्या संचालिका डॉ. के. सत्यलक्ष्मी अशा अनेक नामवंत मान्यवरांच्या लेखणीतून हा अंक शब्दबद्ध झाला आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »