पुणे :  ‘बीएमसीसीचे प्राचार्य पद हे मोठे आव्हान होते आणि संधी होती. अनेक ऋषितुल्य व्यक्तिंनी ते भूषविले होते. या व्यक्ति अनुभवाने मोठ्या आणि वलयांकित होत्या. प्रत्येक व्यक्ति म्हणजे एक संस्था होती. अशा महाविद्यालयाचे काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. आपण साध्य नाही साधन आहोत. मी साधनसुचिता जपून काम केले. जे जे यश मिळाले त्यामध्ये व्यवस्थापन, प्रशासन, शिक्षक, शिक्षकेतर, माजी विद्यार्थी आणि महत्त्वाचे विद्यार्थी यांना त्याचे श्रेय जाते. मी निमित्त मात्र आहे. असे मत  बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी व्यक्त केले. निमित्त होते ते बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचे.
महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. देशपांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. रावळ म्हणाले, ‘येणारे दिवस कसोटीचे आहेत. शासनाकडून ङ्गार अर्थसहाय्य मिळेल असे नाही, पदांची भरती होत नाही, किङ्गायतशीर शुल्क आकारुन शिक्षण देण्याचे संस्थापकांचे सामाजिक भान ठेवायचे आहे. लोकल टू ग्लोबल स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांना तत्काळ आणि नाविन्यपूर्ण सेवा द्यायची आहे. त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल. त्याची योजना करावी लागेल. बहुशाखीय अभ्यासक‘म सुरू करावे लागतील. चांगल्या सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. सर्वांनी एकसंघ प्रयत्न केल्यास यश निश्‍चित आहे.’

बीएमसीसीला ७५ वर्षांची परंपरा असून या ठिकाणी कळत नकळत एक माहोल तयार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ते केंद्र बनले आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय नेतृत्व गुणांच्या जोरावर प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी गेल्या दहा वर्षांत बीएमसीसीची संपन्नतेची मालिका चालू ठेवीत विकास आणि विस्तार करण्याचे आव्हान सातत्यपूर्ण प्रयत्नांतून सिद्ध करून दाखवले असून महाविद्यालयाला विकसित टप्प्यावर आणून ठेवले असल्याचे गौरवोद्गार शिक्षण तज्ज्ञ आणि बीएमसीसीचे माजी प्राचार्य डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी काढले


डॉ. कुंटे म्हणाले, ‘डॉ. रावळ यांच्या सार‘या ताकतीची विविध माणसे डेक्कन एज्युकेशन सोसायटीत विविध पदांवर कार्यरत असल्याने संस्था पुढे आली आहे. निवृत्तीनंतर अधिक वेळ मिळाल्याने डॉ. रावळ यांना अधिक संधी उपलब्ध होतील आणि क्षमतांना पैलू पडतील. डेक्कन एज्युकेशन सोसायटीत प्राथमिक शाळांपासून उच्च शिक्षणापर्यंत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि माजी विद्यार्थी संपर्क वाढविण्यासाठी विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असणार्‍या डॉ. रावळ यांच्या अनुभवांचा उपयोग करुन  घेणार आहे.’

प्रा. भारती पवार यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांनी परिचय करुन दिला. विविध विभागप्रमुख आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »