पुणे : भूविकास बँकेची थकबाकी भरण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने शेतक-यांसाठी एकरक्कमी कर्ज परतफेड योजना (ओ.टी.एस.) राबविण्यात येत असून या योजनेस दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होऊन शेतक-यांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरावी आणि आपला 7/12 उतारा कोरा करुन घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्था, पुणे ग्रामीण तथा अवसायक भूविकास बँकेचे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी केले आहे.
शासनाने दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी भूविकास बँकेच्या कर्जदार थकबाकीदारांसाठी एक रक्कमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दीर्घ कालावधीपासून थकीत कर्ज विचारात घेता एक रक्कमी कर्ज परतफेड योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांना लाभ घेता यावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
भूविकास बँकेचे या योजनेसाठी एकूण 351 सभासद एक रक्कमी कर्ज परतफेड योजनेसाठी पात्र आहेत. कर्जदार शेतकरी सभासदांनी त्यांचेकडील थकबाकी बँकेच्या सेंट्रल बिल्डिंग समोर, बी. जे. रोड, पुणे स्टेशन जवळ, मुख्य कार्यालय, पुणे (दूरध्वनी क्रमांक 020- 26125103) अथवा गुलटेकडी, मार्केट यार्ड येथील हवेली शाखा, इंदापूर शाखा व शिरुर शाखा येथील कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.