पुणे : संविधानामुळे नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. संविधान प्रत्येकाच्या न्याय हक्काचं संरक्षण करते. यासाठीच सर्वांना सन्मानाने जगता येते असे परखड मत संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष संतोष गाजरे यांनी पुणे येथील संविधान दिन सभेत व्यक्त केले.
मध्यवर्ती इमारत, पुणे स्टेशन येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष अण्णा सावंत, माजी. पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, प्रभाकर कोंढाळकर, महादेव मातेरे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, निलेश ढगे, बाळू थोपटे, मारुती काळे, शिवाजी निवंगुणे आदी उपस्थित होते.
यावेळी गाजरे म्हणाले की, लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम भारतीय संविधानाने केलं. मात्र जातीयवादी प्रवृत्तीचे लोक नेहमीच मनुस्मृतीचे समर्थन करतात आणि संविधानाचे जाणीवपूर्वक अवमूल्यन करतात, ही त्यांच्या विचारांची सडकी विकृती आहे. जातिवाद्यांना मुळासकट उपटण्यासाठी काम भारतीय संविधानाने केलं. म्हणून ‘भारतीय संविधान सर्वोच्च आहे.’ सार्वभौम लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक घराघरात संविधानाचा जागर झाला पाहिजे.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले की, भारतीय संविधानाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश झाला पाहिजे. प्राथमिक शाळेत भारतीय संविधानाचे महत्त्व सांगितले व अभ्यासक्रमात आणले तर प्रत्येक जण घटनात्मक चौकटी समजून घेईल. संविधानाने भारतीय नागरिक म्हणून मुलांची बौद्धिक पातळी वाढेल. प्राथमिक व माध्यमिक शाळेत संविधान शिकवल्या यामुळे प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी ला चांगल्या वाईट गोष्टीचे ज्ञान होईल व गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होणार नाही… अशी व्यवस्था भविष्यात निर्माण होईल. ‘मुलांना लहान वयातच कायद्याचा धाक बसेल… त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने पाठ्यपुस्तकात भारतीय ‘राज्य घटनेचा’ समावेश करावा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून भारतीय संविधान शिकवावे.
आरोग्य कर्मचाऱ्यांसह सर्वांच्या देशव्यापी बंद’ला संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.