पुणे : सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, शक्तिशाली आणि जगातील आर्थिक महासत्ता असणारा आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा आणि भक्ती मार्गांतून मिळालेले संस्कार विद्यार्थ्यांवर करून मूल्याध्याष्ठित पीढी घडविण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक‘मात गडकरी मार्गदर्शन करीत होते. मएसोचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट. अभय क्षीरसागर, सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘शिक्षणावर होणार्या खर्चातून देशातील पीढी संस्कारीत करुन त्यातून व्यक्तिनिर्माण करण्याचे कार्य शिक्षण संस्था करीत असतात. देशाचा विकास करायचा असला तर शिक्षण क्षेत्रात कुठल्या प्रयत्नांची आवश्यकता आहे, याबाबतचा जीवन दृष्टिकोन बाळगून भविष्याच्या निर्मितीसाठी देशाला ‘ऍप्रोप्रिएट व्हिजन’ देण्याचे मोठे कार्य महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने केले आहे.’
गडकरी पुढे म्हणाले, ‘शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणातून समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचवायचे आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता सर्वांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नाविन्यता, कौशल्य, संशोधन अशा सर्वच क्षेत्रांतील ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. तसेच विकासाचा समतोल राखताना व्यक्ती संस्कारीत होऊन त्याचे जीवन परिपूर्ण व्हावे यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण आवश्यक आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रात समरसता आणि समता निर्माण होऊन आत्मनिर्भर भारतासाठी अनुरूप शिक्षण दिले पाहिजे.’
गोखले म्हणाले, ‘शिक्षक आपल्या परीने विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतात. त्याद्वारे दुसर्यांना घडवू शकू असे व्यक्तिमत्व निर्माण झाले पाहिजे. विद्यार्थी गुगल, विकिपीडियाद्वारे माहिती मिळवत असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यापेक्षा एक पायरी पुढे राहिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी शिक्षण थांबवू नये. कायम शिकत राहिले पाहिजे. शिक्षण हा मूलभूत पाया आहे. त्याद्वारे आपण पुढे जाऊ शकतो.’
वर्षा तोरडमल यांनी सूत्रसंचालन केले. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार मानले.