पुणे :  मराठा आरक्षण ,  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान , महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना,  कोरोना प्रसारामुळे आर्थिक संकटात सापडलेले बारा बलुतेदार अशा वेगवेगळ्या प्रश्नांची सविस्तर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे १५ दिवसांचे अधिवेशन घ्या अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली . लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.

विरोधकांच्या टिकेवर सत्ताधाऱ्यांच्या वेगवेगळया क्लुप्त्या

यावेळी पाटील म्हणाले की, राज्यकर्त्यांना घरातून बाहेर पडण्याचे धाडस नसल्याने विधीमंडळाचे अधिवेशन नागपूरमध्ये सरकार घेणार नाही हे निश्चित होते . अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत झालेली वाढ, गतीमंद – मतीमंद मुलींवरील अत्याचार, मराठा आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी १५ दिवसांचे अधिवेशन घेणे गरजेचे आहे. मध्यंतरी घेतलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विरोधकांकडून होणारी टीका ऐकावी लागू नये म्हणून वेगवेगळया क्लुप्त्या  सत्ताधारी पक्षाने लढवल्या.

विविध प्रश्नांवर विधिमंडळात गांभीर्याने चर्चाच नाही

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात अडथळे आणायचे आणि सभागृह कामकाज अर्धा अर्धा तास तहकूब करायचे असल्या खेळ्या सत्ताधाऱ्यांनी केल्या.  परिणामी राज्यापुढील अनेक प्रश्नांवर विधिमंडळात  गांभीर्याने चर्चाच होऊ शकली नाही.

मार्चमध्ये विधीमंडळ अधिवेशन घेण्याची मागणी
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान , कोरोना काळात सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे झालेले मृत्यू यासारख्या मुद्द्यांवरून सरकार पळ काढत आहे. राज्यापुढे असलेल्या विविध प्रश्नांवर सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आम्ही जोरदार संघर्ष करणार आहोत. हिवाळी अधिवेशन होणार नसल्याने नागपूर येथे मार्चमध्ये विधीमंडळ अधिवेशन घ्या आणि नागपूर अधिवेशनाला कायदेशीर स्वरूप द्या, असेही पाटील यांनी नमूद केले.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची निवडणूक प्रमुख म्ह्णून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण घुगे आणि समीर दुधगावकर यांची निवडणूक सह प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »