पुणे : येरवडा येथील पुणे महापालिकेचे राजीव गांधी रुग्णालय महापालिकेनेच पूर्णक्षमतेने चालवावे, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे येरवडा नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी समितीचे शैलेश राजगुरू, निखिल गायकवाड, रुपेश घोलप, धनंजय बाराथे, सुहास कांबळे तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा अश्विनी परेरा, अक्षता राजगुरू उपस्थित होते. यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन येरवडा नागरिक कृती समितीला दिले.
देशातील कोरोना आजाराचे संकट लक्षात घेता गरीब व गरजू रुग्णांना उपचार तसेच इतर आवश्यक बाबींसाठी मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. राजीव गांधी रुग्णालयाची इमारत वापराविना पडून असून याठिकाणी परिसरातील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या तपासण्या, औषध उपचार, एक्स-रे, सिटीस्कॅन, शस्त्रक्रिया तसेच ऑक्सिजन बेडची व्यवस्था तात्काळ करण्याची मागणी यावेळी आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
त्यामुळेच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहराच्या पूर्व भागातील व वडगाव शेरी मतदार संघातील नागरिकांच्या सोयीसाठी राजीव गांधी रुग्णालय पुणे महापालिकेने पूर्ण क्षमतेने सुरु करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ससून तसेच इतर रुग्णालयांवर येणारा रुग्णांचा अधिकचा भार कमी होऊ शकेल. तसेच रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळू शकतील.
शहरातील सात रुग्णालये यापूर्वीच महापालिकेने खाजगीकरण केलेली आहेत. या रुग्णालयातील काही सुविधा खाजगी यंत्रणेमार्फत दिल्या जातात. मात्र त्याकडे देखील महापालिकेचे लक्ष नाही. पुण्यासारख्या मोठ्या स्मार्ट सिटीच्या महानगरात आवश्यक डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ तसेच इतर कर्मचारी पदे मंजूर असून देखील भरण्यात आलेले नाहीत. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन यांनी शहराच्या आरोग्य यंत्रणेचा खेळखंडोबा केला आहे. कोरोनाच्या या महाभयंकर संकट काळात महापालिकेची रुग्णालय इतर खासगी रुग्णालयांच्या मदतीने सुस्थितीत योग्य वेळीच सुरु केली असती तर शहरातील रुग्णांना योग्य ती मदत व उपचार वेळेवर मिळाले असते. मात्र सत्ताधारी व विरोधक यांच्यातील श्रेय वादामुळे नाहक पुणेकर नागरिकांना वेठीस धरले जात आहे.
राजीव गांधी रुग्णालयाच्या संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. तसेच या महत्वपूर्ण प्रश्ना संदर्भात आम्ही स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासनाकडून पुणे महापालिकेकडून पाठपुरावा करू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.