पुणे: कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन जम्बो रुग्णालयातील अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम तसेच इतर सर्व आवश्यक त्या सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले.
शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील सोईसुविधांचा आढावा घेतला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. सुभाष साळुंखे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यांनी जम्बो रुग्णालयातील सोईसुविधांची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयाकडून सुरु असलेल्या उपचाराबाबत विचारपूस केली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यासाठी पुण्यात जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे, जम्बो रुग्णालयामध्ये सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या एकूण खाटांच्या क्षमतेत वाढ करण्यात यावी तसेच कोविडसोबतच इतर आजार असलेल्या रुग्णांवरही उपचार होण्यासाठी प्रत्येक आजारातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच कोरोनासोबतच इतर आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात यावा. औषधांचा तुटवडा होणार नाही, त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.
कोरोना आजारामध्ये सीटी स्कॅन तपासणी महत्त्वाची असल्याचे सांगतानाच या तपासणीसाठी जम्बो रुग्णालयात मोबाइल सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच राज्यात सर्व ठिकाणीच सीटी स्कॅन सुविधा उपलब्धतेबाबत निर्देश देण्यात आले असून सीटी स्कॅनचे दरही निश्चित करण्यात येतील. कोरोना उपचार सुविधा सुलभ होण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. जम्बो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क करण्याच्या सुविधेचा लाभ नातेवाईक घेत आहेत. नातेवाईकाला रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येतो. या सुविधेबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी समाधान व्यक्त केले.
पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जम्बो रुग्णांलयातील सुविधेबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बाणेरच्या कोविड रुग्णालयाचीही पाहणी केली. बाणेर येथे उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातील सोईसुविधांचीही आरोग्यमंत्री टोपे यांनी पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त जयदीप पवार यांनी रुग्णालयातील सुविधेबाबत माहिती दिली. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर उपस्थित होते. बाणेरच्या कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन सुविधेसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची टाकी, ऑक्सिजन सिलिंडर, मॅनिफोल्ड, शेड व कॉम्प्रेसर, व्हॅक्यूम पंपची व्यवस्था आदी सुविधांचीही पाहणी केली.