पुणे :  महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी ही राज्‍यातील एकमेव प्रशिक्षण संस्‍था असून इथे आवश्‍यक त्‍या सोयी-सुविधा निर्माण करण्‍यासाठी राज्‍य शासन मदत करेल, अशी ग्‍वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. प्रबोधिनीला भेट दिल्‍यानंतर त्‍यांनी प्रशिक्षणार्थ्‍यांशी संवाद साधला. त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राज्‍य गुप्‍तवार्ताचे आयुक्‍त आशुतोष डुंबरे, संचालक प्रदीप देशपांडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्री देशमुख म्‍हणाले, पहिल्‍यांदाच या प्रबोधिनीला भेट देण्‍याचा योग आला. कोणत्‍याही राज्‍यात अशी संस्‍था नाही, फक्‍त महाराष्‍ट्रात आहे. नामवंत प्रशिक्षकांकडून येथील प्रशिक्षणार्थ्‍यांना गुप्‍तवार्ताचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. येथे राष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रशिक्षण संस्‍थेसारख्‍या सोयीसुविधा निर्माण व्‍हाव्‍यात, यासाठी राज्‍य शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील.

प्रत्‍येक राज्‍यात खालपासून वरपर्यंत गुप्‍तवार्ता यंत्रणा आवश्‍यक आहे. अस्थिरता निर्माण करु पाहणा-या शक्‍ती बॉम्‍बस्‍फोटासाठी ड्रोनसारख्‍या वेगवेगळया तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. अशा गोष्‍टींवर वेळेपूर्वी मात करणे आवश्‍यक आहे, त्‍यासाठी गुप्‍तवार्ता यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. येथे प्रशिक्षण घेतलेले अधिकारी भविष्‍यात राज्‍याची आणि देशाची सेवा करतील, अशी आशा गृहमंत्री देशमुख यांनी व्‍यक्‍त केली.

राज्‍य गुप्‍तवार्ताचे आयुक्‍त आशुतोष डुंबरे यांनी संस्‍थेच्‍या प्रशिक्षणाची माहिती दिली. संचालक प्रदीप देशपांडे यांनी येथे देण्‍यात येणा-या प्रशिक्षणाच्‍या आराखड्यात काळानुरुप बदल केले जात असून राष्‍ट्रीय स्‍तरावरील तज्ञ, प्रशिक्षक येऊन मार्गदर्शन करत असल्‍याचे सांगितले. सूत्रसंचालन  विजय पळसुले यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थ्‍यांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

            गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्‍य राखीव पोलीस बलाच्‍या कार्यालयास भेट देवून अधिका-यांशी चर्चा केली. पोलीस उप महानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस महासंचालक अर्चना त्‍यागी, समादेशक निवा जैन यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तत्‍पूर्वी गृहमंत्री देशमुख यांनी शहीद स्‍मारकास पुष्‍पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.

0000

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »