पुणे : पुण्यातील उद्योगपती विजय पुसाळकर यांच्या तर्फे ‘पुणे शहर पोलीस दल कल्याण’ साठी ५० लाख रूपयांचा धनादेश हस्तांतरीत करण्यात आला. यावेळी राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल उपस्थित होते. तसेच पोलिस दलातील कुटूंबातील पाच मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी विजय पुसाळकर यांच्या ट्रस्ट तर्फे घेणार असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना विजय बी. पुसाळकर म्हणाले की, देशामध्ये कोविड-१९ या महामारीने न-भुतो न-भविष्यती अशी परिस्थिती निर्माण केली आहे. अशा अवघड आणि कठीण प्रसंगातही पोलीस दल हे आपली जबाबदारी पार पाडतच असून त्यांनी त्यापुढेही जाऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. आपले जीव धोक्यात येत असतानाही त्यांनी बजावलेली चोख कामगिरी ही वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या याच धैर्य आणि शौर्य कार्यासाठी माझ्या तर्फे ही मी छोटीशी मदत करत आहे. पुणे शहर पोलीस दल कल्याणासाठी ५० लाख रूपयांचा निधी देत आहे. याबरोबर पोलीस दलातील पाच मुलींच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्या ट्रस्ट तर्फे मी घेत असल्याचेही जाहीर केले.
संपूर्ण जगाला हादरवून टाकणार्या कोविड-१९ महारोगाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता, अविरत कार्य करणार्या पोलीस दलाप्रति कृतज्ञता व्यक्त करताना, त्यांना व त्यांच्या कुटूंबीयांसाठी छोटीशी मदत म्हणून पुण्यातील नामवंत उद्योगपती व इंडो शॉट्ले ऑटो पार्ट प्रा.लि.चे अध्यक्ष विजय बी. पुसाळकर यांनी ५० लाख रूपयांचा धनादेश ‘पुणे शहर पोलीस दल कल्याण’साठी दिला.
राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल म्हणाले की, करोना महामारीच्या काळामध्ये पोलीस दलाने विविध परिस्थितींचा सामना केला. यामध्ये वेगळ्या प्रकारची संचारबंदी, लॉकडाऊन अशा काळात पोलीस दलाने कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकीची जबाबदारीपण बजावली.
पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वैंकटेशम् यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले की, समाजातील सगज नागरिक हा सुध्दा एक पोलीसच असतो. विविध सामाजिक आपत्तीमध्ये पोलीस दल सर्तक राहून नागरिकांचे रक्षण करत असतात. विजय पुसाळकर यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जपणार्या उद्योगपतींकडून पोलीस दलाला मिळलेल्या या मदतीसाठी मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी जो निधी दिला आहे त्याचा दलाच्या कल्याणासाठी सुयोग्य वापर करण्यात येईल.
विजय पुसाळकर यांना पोलीस दलाच्यावतीने स्मृतिचिन्ह राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या हस्ते देण्यात आले.