भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई : मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे.

ते म्हणाले की, केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली.

सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही. “ठाकरे सरकार”ला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत “घंटानाद आंदोलन” विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे. या आंदोलनाला भाजपा पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील.

ते म्हणाले की, तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »