मसाप’चा डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार डॉ. द. दि. पुंडे यांना प्रदान

पुणे : ‘बुद्धी आणि स्मृती या दोन गोष्टींचे वरदान फक्त माणसालाच लाभले आहे. जिथे-जिथे ज्ञानकण मिळतील तिथे-तिथे ते वेचून आपले जीवन समृद्ध आणि संपन्न करणे हाच खरा ज्ञानमार्ग आहे.’ असे मत डॉ. द. दि. पुंडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कै. डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार डॉ. द. दि. पुंडे याना मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते त्यांच्या घरी जाऊन प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या अनेक आठवणींना डॉ. पुंडे यांनी उजाळा दिला. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, पराग जोगळेकर आणि डॉ. उज्ज्वला जोगळेकर उपस्थित होते.
पुंडे म्हणाले, ‘भाषेच्या अभ्यासक्रमाची पाठयपुस्तके तयार करताना विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. पाठ्यपुस्तके वाचून अवांतर वाचनाची ओढ त्यांच्यात निर्माण व्हायला हवी या दृष्टीने परदेशातील विद्यापीठात प्रयत्न केले जातात. तसे प्रयत्न आपल्याकडेही व्हायला हवे.’


प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘मराठीच्या अध्यापनाबरोबरच डॉ. पुंडे यांनी वाङ्मयेतिहासाचे तत्वज्ञान या विषयासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. जोगळेकर हे मराठीची वाड्मयीन गुणवत्ता आणि भाषेची शुद्धता याबाबत कमालीचे दक्ष होते. आज मागणी नसताना अभ्यासक्रमात नियम शिथिल करून मराठी भाषालेखन, वाचनाबाबत आपण अकारण मुलांच्या क्षमतांवर संशय घेत आहोत.’ प्रमुख कार्यवाह प्रकाश यांनी प्रास्ताविक केले.