22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणार कार्यक्रम

पुणे: गणेशोत्सव म्हटलं की सर्वत्र उत्साह संचारलेला असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करत असताना उत्सवावर काही मर्यादा आल्या आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि मर्यादांवर मात करत हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने 129 व्या वर्षानिमित्त पुण्यासह जगभरातील गणेशभक्तांसाठी पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सांस्कृतिक महोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान केल्या जाणार आहे. परिषदेला पुनीत बालन यांच्यासह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, लीड मीडियाचे विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाबद्दल बोलताना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, श्री गणरायांचे आगमन हा आनंदाचा, उत्साहाचा, समाजात नवचैतन्य निर्माण करणारा उत्सव आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे समाजात सध्या काही प्रमाणात निराशेचे वातावरण निर्माण झालेले आहे, गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे, पुण्याने जगाला सार्वजनिक गणेशोत्सव दिला, त्या गणेशोत्सवाची ओळख विधायक कार्यासाठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, महापालिका प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ट्रस्टच्या वतीने विधायकतेला आधुनिकतेची जोड देत गणेशोत्सवानिमित्त पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे, या विधायक उपक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल असा विश्वास वाटतो. भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवाचे जे 129 वे वर्षे आहे.
भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांची वैविध्यपूर्ण संगीत मैफल अनुभवायला मिळणार आहे. शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या खास गायकीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. आंतराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे, बासरीच्या मंजुळ स्वरांनी रसिकांना मोहित करणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची जुगलबंदी अविस्मरणीय ठरणार आहे. याशिवाय सुप्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी यांची सुगम व मेलडियस गाण्यांची श्रवणीय मैफल रंगणार आहे. सुप्रसिद्ध लोककलावंत नंदेश उमप आणि गणेश चंदनशिवे हे या सांस्कृतिक महोत्सवात लोककलेचे, लोकगीतांचे विविध रंग उलगडणार आहेत. ‘लिटिल चॅम्प’ फेम युवा गायक प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यांची सुरेल मैफल गणेशभक्तांची मने जिंकणारी ठरेल. तसेच महोत्सवामध्ये पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ, सह-पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल यांच्या मुलाखतीमधून गणेशोत्सव उलगडणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे, भार्गवी चिरमुले, मिलिंद कुलकर्णी आणि विनोद सातव करणार आहेत.


www.shrimantbhausahebrangariganpati.com या अधिकृत संकेतस्थळावर होणार आहे. हा सांस्कृतिक महोत्सव सर्व गणेशभक्तांना विनामूल्य अनुभवता येणार आहे, यामुळे गणेशभक्तांनी घरी सुरक्षित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन पुनीत बालन यांनी केले आहे.
सेवेकऱ्यांना दरवर्षीच्या सेवेची जाणीव ठेऊन ‘कृतज्ञता मानधन’ देणार आहोत, यामध्ये बैलजोडीचे मालक, मांडव, साऊंड, लाईट आदी सेवेकऱ्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवात पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल त्यानुसार श्री गणरायांची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मांडवातच केले जाईल, गणेशोत्सवादरम्यान मांडवात मोजकेच कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नियोजन केले आहे. ‘श्रीं’ प्राणप्रतिष्ठा सभामंडपातच आणि दर्शन फक्त ऑनलाईन बघण्याची सोया देखील भाविकांसाठी केली आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना सालाबादप्रमाणे मंदिरा मध्ये होणार आहे. उत्सव मोठा नसला तरी सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने केले जाणार आहेत. ‘बाप्पा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांना मंदिरात, मांडवात प्रवेश दिला जाणार नाही, भाविकांना सांस्कृतिक महोत्सवासह गणरायांच्या दर्शनाचा आणि आरतीचा लाभ फक्त ऑनलाईन घेता येणार आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साधेपणाने आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा करावा तसेच पुणेकरांनी सुद्धा घरातच सुरक्षित राहून उत्सव साजरा करावा, विसर्जन सुद्धा घरातच करावे असे आवाहन पुनीत बालन आणि ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »