पुणे: दरवर्षी होणा-या वैभवशाली गणेशोत्सवाचा डामडौल रद्द करुन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त व नागरिकांमध्ये याचा प्रार्दुभाव वाढू नये, याकरीता लोकभावना जपण्यासाठी मंदिरात उत्सव होणार आहे. दरवर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दगडूशेठ गणपती विराजमान होतो. मात्र, गेल्या १२७ वर्षात यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होत आहे.
पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाइन दर्शन सुविधेवर व ऑनलाइन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी मंदिरामध्येच उत्सवात गणपती विराजमान होणार आहे. यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही.
अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी होणारी अलोट गर्दी पाहता यंदा मंदिरामध्येच श्रींची मूर्ती ठेऊन धार्मिक विधी करण्याचा निर्णय नागरिक व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने ट्रस्टने घेतला आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षक असलेले सामुहिक महिला अथर्वशिर्ष पठण, शालेय विद्यार्थी अथर्वशिर्ष पठण यांसह इतर कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. उत्सवकाळात अभिषेक, पूजा, आरती, गणेशयाग असे सर्व धार्मिक विधी मंदिरामध्ये गुरुजींद्वारे केले जाणार आहेत. भक्तांतर्फे स्वहस्ते होणारा अभिषेक देखील रद्द करण्यात आला आहे. यावर्षी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. भक्तांनी नाव व गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व दर्शनसुविधा ऑनलाइन. यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ट्रस्टने ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अर्थवशिर्ष याविषयावर प.पू.स्वानंदशास्त्री पुंड महाराज यांचे निरुपण दिनांक ११ ते ३१ आगस्ट दरम्यान दररोज दुपारी ४ वाजता होणार आहे. याशिवाय स्वराभिषेक देखील दिनांक १८ आगस्ट पासून सकाळी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध कलाकार आपली कला श्रीं चरणी अर्पण करणार आहेत. उत्सवकाळात श्रीं ची आरती ऑनलाइन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी ७.३० व रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येईल.



श्रीं चे ऑनलाइन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यूट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाइन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात दर्शनासाठी येणा-यांसाठी एलईडी स्क्रिनची व्यवस्था व सीसीटीव्हीचे सुरक्षाकवच असणार आहे. श्रीं चे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांसाठी बेलबाग चौक आणि बुधवार चौक येथे एलईडी स्क्रिन ची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना लांबून देखील श्रीं चे दर्शन घेता येईल. तसेच मंदिरामध्ये व परिसरात कायमस्वरुपी असलेल्या ६० सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जाणार आहेत.